

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षासाठी राज्यात अकरावीसाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षण संचालनालयाकडून भाग दोन भरण्यासाठी शनिवारी (दि.७) १२.३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. पहिल्या फेरीसाठी गुरुवारी (दि. ५) अंतिम तारीख संपल्यानंतर ६० हजार ६८१ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दोन्ही भाग पूर्ण केले.
इयत्ता अकरावी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी दि. २६ मे ते ५ जून अशी मुदत देण्यात आली होती. या कालावधीनंतरही शनिवारी (दि. ७) दुपारी १२.३० पर्यंत अर्जाचे दोन भाग पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला. शिक्षण विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार शनिवारी(दि.७) जिल्ह्यात ६० हजार ६८१ विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दोन्ही भाग पूर्ण केले आहेत. नाशिकसह धुळे, नंदुरबार आणि जळगाव या विभागात १३ लाख ९७२ विद्यार्थ्यांनी अर्जचे दोन्ही भाग पूर्ण करुन ते लॉक करण्यात आले आहेे.
दरम्यान, विद्यार्थी तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर विद्यार्थी हरकती नोंदवू शकणार आहेत. त्यानंतर रविवारी (दि. ८) शून्य फेरी गुणवत्तायादी अर्थात अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून त्याआधारावर मंगळवारी (दि. १०) पहिल्या फेरीतील गुणवत्तायादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान भाग-२ भरलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंतीक्रम बदलण्याची सुविधा या दरम्यान मिळणार आहे. वेळापत्रकानुसार शून्य फेरी गुणवत्तायादी रविवारी (दि. ८) जाहीर होणार आहे. 'कॅप' फेरीची गुणवत्तायादी १० जून रोजी जाहीर होणार असून दि. ११ ते १८ जून या काळात कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत.