

देवळाली कॅम्प (नाशिक) : चालू वर्षी दहावीचा निकाल लागून दोन महिने उलटले, तरी अद्यापही अकरावीचे प्रवेश निश्चित झालेले नाहीत. हे प्रवेश ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शिक्षण संचालकांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शिंदे समाज सेलचे प्रदेशाध्यक्ष रतन चावला यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनाही निवेदन पाठवत शिक्षण विभागाला जागे करण्याचे आवाहन केले आहे.
चावला यांनी शिक्षण संचालक पुणे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दहावीचा निकाल दि. 13 मे 2025 रोजी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे विभागीय मंडळाकडून जाहीर करण्यात आला. त्याचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना वेळेत अकरावीमध्ये प्रवेश मिळून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावे हा होता. तसेच शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पुरेसा कालावधी मिळावा. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षा वेळेत होतील. परंतु इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे इयत्ता दहावीचा निकाल वेळेवर लवकर लागूनदेखील आजपावेतो अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक व महाविद्यालय प्रशासन अडचणीत आलेले असून, विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे, याकडे चावला यांनी लक्ष वेधले.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहे. आपल्या कार्यालयाकडून तसेच शासकीय स्तरावर या अडचणी वेळेत सुधारल्या जात नसल्याचेदेखील निदर्शनास आलेले आहे. वैयक्तिक लक्ष घालून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केल्यास विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळणार आहे, असे चावला यांनी म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार किशोर दराडे यांना निवेदन पाठवले आहे.