नाशिक : आतापर्यंत राज्यातील मराठवाडा, निम्मा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तब्बल शंभर विधानसभा जागांची चाचपणी केली असून, लवकरच संपूर्ण २८८ जागांचा आढावा घेतला जाणार असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधताना, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचाही घणाघात केला.
नाशिक काँग्रेस आढावा बैठकीप्रसंगी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शाळकरी मुली, महिलांवर दररोज अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. सरकार या घटना थांबविण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेच, शिवाय गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे कामही त्यांच्याकडून केले जात आहे. बदलापूर घटनेत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस प्रशासनाने केलेला विलंब संतापजनक आले. त्यामुळे जनतेत या सरकारविषयी प्रचंड आक्रोश आहे. सरकारचा चेहरा जनतेसमोर उघड करण्यासाठी आगामी काळात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मविआ'त जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसला तरी, गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष म्हणून काँग्रेससमोर आल्याने आघाडीत सर्वाधिक जागांवर काँग्रेसकडून सुरुवातीपासूनच दावा केला जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी २८८ जागांबाबत आढावा घेतला जात असल्याचे स्पष्ट केल्याने, काँग्रेस सर्व जागा लढविण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी संकेत दिले.