नाशिक : महाराष्ट्र बंद बेकायदेशीर ठरवत कोर्टाने विरोधकांना चपराक दिली आहे. या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच भरडला जातो. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकारतर्फे केली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या ब्रॅण्डिंगसाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोर्टाने महाराष्ट्र बंद बेकायदेशीर ठरविला आहे. कोर्टाने या आधीदेखील अशा प्रकारच्या बंदबाबत निर्णय घेतले होते आणि दंडही सुनावले होते. तरीसुद्धा विरोधी पक्ष बंद करण्याचा आग्रह धरत आहेत. या बंदमुळे सर्वसामान्य माणूसच भरडला जातो. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय दिला त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल, एवढेच मी सांगू इच्छितो. कोर्टाच्या निर्णयाचा आदर, अंमलबजावणी सरकार करेल, असा सूचक इशारा शिंदे यांनी दिला. सभेतील भाषणातही शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, राज्यात काही लोकांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवण्याची एवढी घाई झाली आहे की, लोकांच्या दु:खातही त्यांना राजकीय संधी दिसते. अशी विकृती वेळीच ओळखली पाहिजे. बदलापूरची घटना जितकी दुर्दैवी आहे, त्यापेक्षा या घटनेचे राजकारण अधिक दुर्दैवी आहे. लाडकी बहीण योजनेमुळे पोटदुखी झालेल्या विरोधकांकडून बंदच्या माध्यमातून महाराष्ट्रात अराजक माजविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करत महाराष्ट्र बंद काय करता, विकृत राजकारण बंद करा, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सुनावले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदरच केला पाहिजे. या आधीदेखील न्यायालयाने अतिशय स्पष्ट निर्देश दिले होते. राजकीय पक्षांना अशा प्रकारचा बंद करता येणार नाही, असे न्यायालयाने सुनावले होते. न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका घेतल्याने विरोधकांनी बंद मागे घेतला असेल, तर त्यांची भूमिका योग्य ठरेल. न्यायालयाचा सन्मान सर्वात महत्त्वाचा असल्याचे फडणवीस म्हणाले.