Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी? पंचवटीत ठिकठिकाणी कचरा, गाळ अन् चिखल!

Nashik : स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी? पंचवटीत ठिकठिकाणी कचरा, गाळ अन् चिखल!
Published on
Updated on

पंचवटी, नाशिक : गणेश बोडके
'स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळख आता खरोखरी….', अशी गाण्याची ट्यून कुठे ऐकू आली तर किती बरे वाटते, परंतु पंचवटीतील काही मुख्य रस्त्यांवरून आणि चौकांतून फेरफटका मारल्यावर वरील ओळी केवळ ऐकण्यासाठीच बर्‍या असून, प्रत्यक्षात परिस्थिती या उलट असल्याचे दिसून येते.

सध्या पंचवटीतील बर्‍याच भागांमध्ये ठिकठिकाणी कचरा, गाळ आणि चिखलाचे साम—ाज्य निर्माण झाले आहे. ही परिस्थिती प्रत्येक चौकाचौकांत, रस्त्यांलगत दिसून येत आहे. ही परिस्थिती पाहून 'आपण नक्की स्वच्छ आणि सुंदर नाशिकमध्ये आहोत का, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. मागील काही वर्षांपासून पंचवटी परिसराचा ज्या वेगाने विस्तार होत आहे, त्याच वेगाने येथे अस्वच्छताही वाढत आहे. पंचवटीतील कुठल्याही भागात फेरफटका मारला तरी येथील आरोग्य यंत्रणा नेमके काय काम करते, याविषयी शंका निर्माण होते.

दिंडोरी रोड
दिंडोरी रोड

हल्ली पंचवटीत कोणत्याही ठिकाणी गेले की, कचर्‍याचे ढीग दिसतात. हे कचर्‍याचे प्रमाण आता इतके वाढले आहे की या रस्त्यांवरून पायी चालणेदेखील नागरिकांना असह्य होते. या कचर्‍यात बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, कपड्यांच्या चिंध्या, शिळे अन्न असा घरगुती कचरा दिसून येतो. पावसाच्या या वातावरणात हा कचरा सडल्याने दुर्गंधी सुटत असून, ही परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

पंचवटी परिसरातील साचलेला कचरा, गाळ, चिखल उचलण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उभा राहतो. संबधित यंत्रणेकडून याकडे काणाडोळा केला जात असल्याचे दिसून येते. यामुळे परिसरात साथीच्या आजारांचाही धोका वाढला आहे.

प्लास्टिक खाल्याने जनावरांना त्रास

पेठरोड, खंडेराव मंदिर
पेठरोड, खंडेराव मंदिर

शहरात कचरा गोळा करण्यासाठी रोज घंटागाड्या येतात. तरीही नागरिक रस्त्यावर 'घाण' करण्यात धन्यता मानतात. कचरा टाकण्यासाठी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. कचरा गोळा करताना प्लास्टिक पिशव्याही इतर कचर्‍यांसोबतच राहतात, त्याचे विघटन नाही. रस्त्यावर साचलेल्या प्लास्टिक पिशव्या मोकाट जनावरे खात असतात. भविष्यात जनावरांच्या पोटात प्लास्टिक साचून राहते व त्यांना त्रास व्हायला सुरुवात होतो. यात अनेक जनावरे दगावल्याचेही निष्पन्न झाले आहे. या सर्व बाबीची दखल घेत कडक मोहीम राबविण्याची गरज आहे.

स्वच्छ सर्वेक्षण जैसे थे

दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेवेळी सगळीकडे साफसफाई दिसते. स्पर्धा संपली की पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'च होते. त्यामुळे स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक मोहिमेंंतर्गत लाखो रुपयांचा खर्च नेमका कुठे जातो, असा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जातो आहे.

निमाणी
निमाणी

स्मार्ट सिटीत बकाल स्वरुप

पूर्वी पंचवटी म्हणजे गोदावरी नदी, रामकुंड, मंदिरे, धर्मशाळा, जुने गावठाण, वाडे आणि सभोवतालचे मळे, वस्ती त्याकडे जाणारे कच्चे रस्ते आणि पुढे गेले की दाटझाडी आणि डोंगर असा काहीसा हिरवागार परिसर असे वातावरण होते. येथे फरफटका मारताना अतिशय मनमोहक वाटत असे. पण, आता नाशिकची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना गावठाणातील घरे आणि वाडे यांची जागा मोठमोठ्या बहुमजली इमारतींनी घेतली आहे. कच्च्या रस्त्यांची जागा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांनी घेतली आहे. परंतु त्यातील खड्ड्यांची आणि अस्वच्छतेची मूळ समस्या तशीच असून, दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news