Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके…आता लागणार शक्ती पणाला!

Nashik : शिवसेनेचे प्रदर्शन ओके…आता लागणार शक्ती पणाला!
Published on
Updated on

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेला हादर्‍यावर हादरे बसत असल्याने महाराष्ट्रातील हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. 'शिवसंवाद' यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिकांशी संवाद साधून निवडणुकीच्या चाचपणीबरोबरच आगामी काळात शिवसेनेबरोबर कोण आणि किती ताकद उभी राहू शकते याबाबतचा कानोसा घेत आहेत. भावनिक साद घालत आदित्य ठाकरे राजकारणाची वेगळी व्याख्या मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातून विविध ठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी शिंदे गटामध्ये प्रवेश करत असतानाचे चित्र एकीकडे दिसत असताना नाशिकमधून अद्याप शिवसेनेला धक्का बसलेला नाही. यामुळे ही बाब खरे तर शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेचे प्रदर्शन टक्कर देणारे झाले असले तरी खरी कसोटी यापुढच्या काळातच लागणार असल्याने त्यासाठी शिवसेनेची शक्ती खर्‍या अर्थाने पणाला लागणार आहे.

शिवसेना आणि शिंदे गट न्यायालयीन लढा आणि आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोरासमोर उभे ठाकले आहेत. यामुळे या दोन्ही कायदेशीर बाबींचा कल काय लागतोय यावरच दोन्ही बाजूंचे भवितव्य ठरणार आहे. त्यातही महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावरच सत्तांतराचे नाट्य घडून आल्याने त्याला खूप मोठे वलय निर्माण झाले आहे. शिवसेनेतील जवळपास 40 आमदार आणि आता 13 हून अधिक खासदार त्याचबरोबर मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, पालघर, जळगाव यांसारख्या मोठ्या शहरांमधूनही शिंदे गटाकडे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा ओघ सुरू झाल्याने शिवसेनेला पडणारे हे भगदाड बुजविण्याकरता शिवसेनेतील बड्या नेत्यांनी दौरे सुरू करत डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातही शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी मुख्य जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शिवसंवाद यात्रा हाती घेतली आहे. जुन्या जाणत्या नेत्यांपेक्षा शिवसैनिकांपुढे आणि त्यातही तरुण आणि नवतरुणांना आपलेसे करण्यासाठी युवा चेहराच उपयोगी पडू शकतो यादृष्टीनेच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या हाती शिवधनुष्य दिले असावे. त्यांच्या या दौर्‍यामागे आणखी एक कारण असू शकते आणि ते म्हणजे यापुढील काळात शिवसेनेचा चेहरा हा आदित्य ठाकरेच असणार आणि त्यासाठीच येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विशेषत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांना नव्याने लाँच करण्याचा मार्ग निवडला असावा. असे असेल तर आदित्य ठाकरे यांचे उत्तर महाराष्ट्रातील दौरे पाहिले आणि त्यांच्या मेळाव्याला झालेली गर्दी पाहता शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरेंना पसंती दिली जात असल्याचेच चित्र या संपूर्ण दौर्‍यातून पाहावयास मिळाले हे मात्र नक्की!

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक महापालिकेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नाशिकमधून शिवसेनेचे दोन आमदार दादा भुसे आणि सुहास कांदे तसेच खा. हेमंत गोडसे वगळता अन्य कुणीही शिंदे गटाच्या गळाला लागलेले नाही. यामुळेच शिवसेनेच्या अनुषंगाने ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला शाबूत राखण्याकरता विशेष काळजी घेतली जात असून, तूर्तास तरी नाशिकमधून कोणी शिंदे गटात सहभागी होईल, अशी शक्यता वाटत नाही. परंतु, न्यायालयीन निकाल आणि निवडणूक आयोगाकडे शिवसेना आणि चिन्हाबाबत काय निकाल लागतो यावर बरेच काही अवलंबून राहील. तोपर्यंत तरी नाशिकमध्ये शिवसेनेला सुरूंग लागण्याची शक्यता नाही.

शिवसेनेला खिंडार की टक्कर…
नाशिक महापालिकेत शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यानंतर भाजपने गेल्या 10 वर्षांपासून सत्तेपासून दूर ठेवले आहे. यामुळे हीच गत आगामी होणार्‍या निवडणुकीत कायम ठेवण्याच्या दृष्टीने भाजपकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. आता राज्यात सत्तांतर झाल्याने हे सत्तेचे बाळसे नाशिक मनपातील सत्तेला तग धरून ठेवण्यास पुरेसे ठरू शकते. तर दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून सत्ता खेचून आणण्याकरता कसोशीने प्रयत्न केले जात आहे. नाशिकमधील शिवसेना अभेद्य राहिली तर भाजपला शिवसेनेबरोबर तेवढ्याच ताकदीने टक्कर द्यावी लागणार आहे. परंतु, शिवसेनेला आगामी काळात खिंडार पडले तर शिवसेनेला सत्ता राखण्याच्या दृष्टीने महत्प्रयास करावे लागतील हेही तितकेच खरे!

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news