नाशिक : ‘मविप्र’वरील 140 कोटींचे कर्ज कमी करणार- अ‍ॅड. नितीन ठाकरे

नितीन ठाकरे,www.pudhari.news
नितीन ठाकरे,www.pudhari.news
Published on
Updated on

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पाटोदा येथे अद्ययावत महाविद्यालय सुरू करण्याबरोबरच तालुक्यातील ज्या शाळांना इमारतींची आवश्यकता आहे, त्या शाळांसाठी लवकरच इमारती उभ्या केल्या जातील. तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेवर गत संचालक मंडळाने उभा केलेला तब्बल 140 कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर निश्चितच कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार, असे प्रतिपादन मविप्रचे नवनिर्वाचित सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले.

एरंडगाव येथील अंजनी सूर्य लॉन्स येथे मविप्रच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाचा सत्कार समारंभ जिल्हा सहकार चळवळीचे नेते तथा मविप्रचे माजी संचालक अंबादास बनकर, येवल्याचे संचालक नंदकिशोर बनकर व बनकर कुटुंबीयांकडून आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी उपस्थित सभासदांसमोर अ‍ॅड. ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद द्वारकानाथ कोकाटे होते.

अ‍ॅड. ठाकरे म्हणाले की, यंदाची निवडणूक ऐतिहासिक झाली. कारण गत निवडणुकीत बनकरांना आम्ही पॅनलमध्ये येण्यासाठी खूप गळ घातली होती. पण, ते काही गळाला लागले नाहीत. ते जर गत निवडणुकीत आमच्याबरोबर असते, तर पाच वर्षांपूर्वीच आमच्या पॅनलची सत्ता मविप्रमध्ये दिसली असती. मात्र, बनकर खूप हुशार आहेत. त्यांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा आहे. यंदाही ते गळाला लागेना. मात्र, आम्ही खूप आग्रह केल्यानंतर त्यांनी आपले बंधू नंदकिशोर बनकर यांची उमेदवारी घेतली. आमच्याकडे उमेदवारीसाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र, बनकरांना उमेदवारी देण्यासाठी आम्ही आग्रह धरला, तेव्हा कुठे त्यांनी होकार दिला, अन् आपल्या भावाला उमेदवारी घेतली. त्यांच्या उमेदवारीने पॅनलला ही निवडणूक सोपी गेली, असेही अ‍ॅड. ठाकरे म्हणाले.

यावेळी उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, संचालक संदीप गुळवे, डॉ. सयाजीराव गायकवाड, प्रवीण जाधव, अ‍ॅड. लक्ष्मण लांडगे, रवींद्र देवरे, शिवाजी गडाख, डॉ. प्रसाद सोनवणे आदी
उपस्थित होते.

आता विकासासाठी झटणार
आता निवडणूक फीव्हर संपला आहे. संस्थेच्या विकासासाठी आम्ही झटणार आहोत. प्रामाणिकपणे सेवा बजावणार्‍या कोणत्याही कर्मचार्‍यांना विनाकारण त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच नाठाळांच्या माथी काठी उगारावीच लागेल. भविष्यात संगीतशिक्षक, विनाअनुदानित वरील कर्मचार्‍यांना अनुदानितवर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करू असेही ते म्हणाले. यावेळी बनकर कुटुंबीयांच्या वतीने लाख रुपये मदतीचा धनादेश अ‍ॅड. ठाकरेंकडे सुपूर्द करण्यात आला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news