नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सोनांबे शिवारातील घोटी महामार्गावरील आई भवानी डोंगरावर वनप्रस्थ फाउंडेशनने वृक्षलागवड करून संवर्धनाचे काम सुरू आहे. स्वयंसेवकांचे श्रमदान सुरू असताना रोपांच्या खाली सापडलेल्या घरट्यातील पक्ष्याच्या अंड्यांना वाचवून निसर्गाप्रती आपले कर्तव्य बजावले. नुकतेच या अंड्यातून तीन नवजात पिलांचा जन्म झाला असल्याचे स्वयंसेवकांनी समाधान व्यक्त केले.
केवळ रोपांची लागवड हा हेतू न ठेवता, 100 टक्के संगोपन हा हेतू डोळ्यासमोर ठेवून वनप्रस्थचे काम गेल्या पाच वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. त्या अनुषंगाने रोपांची लागवड झाल्यानंतर आई भवानी डोंगरावर श्रमदान सुरू झाले. दरम्यानच्या काळात रोपांची जोपासना, पाणीपुरवठा या गोष्टी सुरू होत्या. नुकतेच रोपांच्या अवतीभोवती उगवलेले गवत काढण्याचे काम वनप्रस्थच्या स्वयंसेवकांनी हाती घेतले होते. तेव्हा वनप्रस्थचे कार्यकर्ते सचिन खर्डे यांना एका रोपाच्या खाली पक्ष्याचे छोटेसे घरटे व त्यात असलेली तीन अंडी दिसली. तेव्हा त्यांना हात न लावता त्या भोवतालचे गवत जैसे थे ठेवून इतर ठिकाणचे गवत काढणीचे काम सुरू ठेवण्यात आले. नुकतीच या अंड्यातून छानशी तीन पिले जन्माला आल्याचे पाहून वनप्रस्थच्या स्वयंसेवकांना खूप आनंद झाला. अनावधानाने ही अंडी फुटली असती, तर या मुक्या जिवांना जन्माला येण्याच्या अगोदरच प्राणांना मुकावे लागले असते. श्रमदानासाठी राजाभाऊ क्षत्रिय, दत्तात्रेय बोर्हाडे, डॉ. महावीर खिंवसरा, अनिल जाधव, सचिन आहेर, सचिन आडणे, मनोज भंडारी, संजय पवार, सचिन कासार, महेश बोर्हाडे आदींसह अनेक स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
तीन महिन्यांच्या परिश्रमातून देवराई विकसित
वनप्रस्थ फाउंडेशनने सुमारे तीन महिन्यांच्या अथक परिश्रमातून केवळ श्रमदानाच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात वीर सावरकरनगर येथे ऑक्सिजन पार्क नावाने नाशिक जिल्ह्यातील दुसरी व सिन्नर तालुक्यातील पहिली देवराई विकसित केली. या ठिकाणी पुणे येथील देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोले पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार, सुमारे 1100 विविध देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्याच्या कडक उन्हातदेखील ही रोपे जगविण्यासाठी वनप्रस्थच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यासाठी सिन्नर नगर परिषद व येथील भूविकासक पटेल यांनी रोपांसाठी पाण्याची व्यवस्था करून दिली.