नाशिक : अडीच हजार विद्यार्थ्यांची यूपीएससी परीक्षेला दांडी

नाशिक : अडीच हजार विद्यार्थ्यांची यूपीएससी परीक्षेला दांडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवारी (दि. 5) देशभरातील विविध शहरांत पार पडली. नाशिक शहरातील 19 केंद्रांवरील परीक्षेसाठी 6 हजार 199 परीक्षार्थी पात्र ठरले होते. प्रत्यक्षात तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरळीत निर्विघ्न पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.

'यूपीएससी'तर्फे नागरी सेवा (पूर्व) परीक्षा दोन सत्रांत घेण्यात आली. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत पेपर क्रमांक एक झाला. या पेपरसाठी 6 हजार 198 विद्यार्थी पात्र होते. प्रत्यक्षात 3 हजार 638 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते, तर 2 हजार 560 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. दुपारच्या सत्रात दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत दुसरा पेपर पार पडला. या पेपरसाठी 6 हजार 198 परीक्षार्थी होते. त्यापैकी 3 हजार 597 परीक्षार्थी परीक्षेला हजर होते. तर 2 हजार 601 परीक्षार्थींनी परीक्षेला गैरहजर राहणे पसंत केले.
दरम्यान, नागरी सेवा (पूर्व) परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. परीक्षा केंद्राभोवती जॅमर लावताना सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी राज्यस्तरीय पर्यवेक्षक (1), समन्वयक पर्यवेक्षक (1), यूपीएससी तपासणी अधिकारी (2), स्थानिक तपासणी अधिकारी (19), पर्यवेक्षक (19), सहायक पर्यक्षक (38), निरीक्षक (560) , लिपीक (45) तर वर्ग चार कर्मचारी (110) तैनात करण्यात आले होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्त होता.

विद्यार्थ्यांची गैरसोय टळली
गेल्या दोन वर्षांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नाशिक केंद्रामध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत. या सुविधेचा नाशिक शहर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लाभ होत असून, त्यांची गैरसोय टळत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news