नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंगणवाड्यांमध्ये बोगस पटसंख्या दाखवून पोषण आहारात होणार्या अपहाराला अटकाव करण्यासाठी मनपाच्या समाजकल्याण विभागाने प्रत्येक अंगणवाड्यातील पटसंख्येची पडताळणी करण्याचे आदेश मुख्यसेविकांना दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे एकापेक्षा जास्त अंगणवाड्यांमध्ये नावे आढळून आल्यास त्यास संबंधित सेविकांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही दिला आहे.
नाशिक शहरात महापालिकेच्या 427 इतक्या अंगणवाड्या आहेत. यापैकी मनपा समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त दिलीप मेनकर यांनी 60 ते 65 अंगणवाड्यांची पाहणी केली. या पाहणीत त्यांना काही त्रुटी आढळून आल्या. अंगणवाड्या पाहणीत मेनकर यांनी विद्यार्थी पटसंख्येबाबत पडताळणी करण्यास प्राधान्य देण्याची सूचना मुख्य सेविकांना केली आहे. पटसंख्येनुसारच विद्यार्थ्यांना शालेय पोेषण आहार मिळावा यादृष्टीने नियोजन करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. काही अंगणवाड्यांमध्ये पटसंख्येनुसार हजेरी नसल्याची बाब समोर आली आहे. एकाच विद्यार्थ्याचे नाव एकापेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये आढळून आल्याने त्याबाबतही पडताळणी करून जादा नाव आढळून आलेल्या अंगणवाडीतून विद्यार्थ्यांची नावे कमी करण्याची सूचना मेनकर यांनी केली आहे. पुढील शैक्षणिक वर्षातील एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत आपापल्या भागात फिरून बालकांचा डेटा गोळा करून अंगणवाड्यातील विद्यार्थी संख्या वाढविण्याबरोबरच शिक्षणाबाबत पालकांची जनजागृती करण्याची सूचनाही अंगणवाडी सेविका व मुख्य सेविकांना करण्यात आली आहे.
एक-एका बचतगटाकडे 15 ते 20 अंगणवाड्यांना पोषण आहार पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आहार पुरवठ्याकरता सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद असून, एका विद्यार्थ्यामागे सहा रुपये अनुदान बचतगटांना अदा केले जाते. विद्यार्थ्यांना आठवड्यातील रविवार वगळता सहाही दिवस उसळ, राजगिरा लाडू, केळी, चिक्की, लापशी अशा प्रकारचा आहार पुरवठा केला जात असल्याची माहिती उपआयुक्त दिलीप मेनकर यांनी दिली.
बचतगटांचेही काम थांबविण्याचा इशारा :
सकस आहार पुरवठ्याबाबत हलगर्जीपणा केल्यास वा निकृष्ट दर्जाचा आहार आढळून आल्यास संबंधित बचतगटांचे काम थांबविण्याचा इशारा मेनकर यांनी 23 बचतगटांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत दिला आहे.
पटसंख्या जास्त दाखविल्यास हजेरीही जास्त लावली जाते. परिणामी पोषण आहार पुरवठा करताना काही प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता गृहीत धरून पटसंख्येनुसार हजेरी पडताळणी करण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे. याशिवाय दर दोन ते तीन महिन्यांनी अंगणवाड्यांची पाहणी करण्यात येणार आहे. – डॉ. दिलीप मेनकर, उपआयुक्त, समाजकल्याण विभाग.