निमा www.pudhari.news
निमा www.pudhari.news

नाशिक : अर्जदारांची नावे गोपनीय, मग हरकती कशा? उद्योजकांचा सवाल

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमावर विश्वस्तपदासाठी धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने उद्योजकांकडून मागविण्यात आलेल्या अर्जांवर काही उद्योजकांनीच हरकती नोंदविल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले होते. मात्र, अर्जांबाबतची कुठलीही प्रक्रिया अद्याप प्रसिद्धच केली नसल्याने, हरकती नेमक्या कशावर मागविल्या, असा प्रश्न आता उद्योजकांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर धर्मादाय सहआयुक्तांनी विश्वस्त निवडीबाबतची प्रक्रिया जलद राबवावी, अशी मागणीही केली आहे.

साडेतीन हजार सभासद संख्या असलेल्या निमावर ऐन सुवर्णमहोत्सवी वर्षात उद्योजकांमधील आपापसातील हेव्यादाव्यांमुळे प्रशासक नेमण्याची नामुष्की ओढवली. त्यानंतर निमावर विश्वस्तांची निवड प्रक्रिया राबविण्याकरिता धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाकडून 4 ऑगस्ट 2021 रोजी जाहिरात प्रसिद्ध करून उद्योजकांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार 42 उद्योजकांनी अर्ज केले होते. त्यातील दोन अर्ज बाद झाल्याने, 40 अर्ज वैध ठरले होते. पुढे या उद्योजकांना धर्मादाय सहआयुक्तांकडून मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणार होते. मात्र, नऊ महिन्यांनंतरही ही प्रक्रिया अजूनही जैसे थेच असल्याने उद्योजकही बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, या अर्जांवर काही उद्योजकांनीच हरकती नोंदविल्याने या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, अर्ज नेमक्या कोणत्या उद्योजकांनी केलेत, याबाबतची कुठलीही माहिती अद्याप समोरच आली नसल्याने, हरकती नोंदविणार तरी कशा? असा प्रश्न उद्योजकांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर हरकती नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रिया असून, त्या नमुन्यातच हरकत नोंदविणे अपेक्षित आहे. त्यामुळे धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने याबाबतचे अधिक मार्गदर्शन करून उद्योजकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करावा तसेच ही प्रक्रिया लवकरात लवकर राबवून संस्थेला ऊर्जितावस्था द्यावी, अशी मागणीही उद्योग वर्तुळाकडून करण्यात आली आहे.

निमाचेही प्रकरणही मार्गी लावा : धर्मादाय सहआयुक्तांनी अवघ्या दीड वर्षात 764 प्रकरणे निकाली काढली. त्यांची ही लक्षणीय कामगिरी नक्कीच नाशिककरांना सुखावणारी आहे. अशात निमा प्रकरणीदेखील त्यांनी तातडीने अशा प्रकारचा निकाल देऊन संस्था पूर्वपदावर आणण्यास मदत करावी, अशी अपेक्षाही उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा  :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news