![नाशिक: निळवंडी पोलीस पाटील यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा: दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पोलीस पाटील अंबादास पाटील यांना अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. या मारेकऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पोलीस पाटील अंबादास पाटील हे आपल्या शेतात गुरूवारी सायंकाळी ५ च्या सुमारास गुरे चारत होते. यावेळी तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून शेतात आल्या. आणि त्यांनी अंबादास पाटील यांना लाठीने जबर मारहाण केली. यात त्यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस पाटील यांनाच मारहाण झाल्याने पोलीस पाटलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मारहाणीचा पोलीस पाटील संघटनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी डॉ. संदिप आहेर, तहसिलदार पंकज पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना पोलीस पाटील संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन मारेकऱ्यांना जेरबंद करावे, अशी मागणी यात करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?