नाशिक : विद्यार्थी परिपाठात गाणार ‘गोदा गीत’

परिपाठ www.pudhari.news
परिपाठ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'दक्षिण गंगा' अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीचे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ऑगस्ट रोजी गोदा कृतज्ञता व संवर्धन गीताचे अनावरण कालिदास कलामंदिरात झाले. त्यानुसार आता हे गीत विद्यार्थ्यांच्या परिपाठात समाविष्ट करण्यात येऊन दररोज प्रार्थनेच्या वेळी गायले जाणार आहे.

या गीताचे संगीतकार संजय गिते आहेत. गीतकार सुरेखा बोर्‍हाडे आहेत. गोदावरी प्रदूषण नियंत्रणामध्ये शिक्षण विभागाचा सहभाग म्हणून सर्व शाळांनी सर्वप्रथम हे गीत सर्व विद्यार्थ्यांना वहीमध्ये लिहून द्यावे. त्याची पार्श्वभूमी सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांना स्पष्ट करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. पहिले 15 दिवस दररोज प्रार्थनेच्यावेळी गोदा गीत विद्यार्थ्यांना ऐकवावे. सर्व विद्यार्थ्यांकडून पाठ करून घ्यावे आणि त्यानंतर दैनंदिन परिपाठामध्ये दररोज विद्यार्थ्यांकडून म्हणवून घ्यावे, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून नाशिक शहरातील सर्व शाळांनी हा उपक्रम राबवणे बंधनकारक असल्याचे शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी कळविले आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी शिक्षण विभागाचा सक्रिय सहभाग आहे. मे 2023 पर्यंत प्रत्येक महिन्याचा कृती कार्यक्रम शिक्षण विभागाने तयार केला असून, त्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news