नाशिक, (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
कधी सीमेवर हाडे गोठवणाऱ्या थंडीत, तर कधी अंगाची लाही लाही करणाऱ्या रखरखीत वाळवंटात देशाच्या सीमेचे रक्षण, कधी बंगालमधील घनदाट जंगलात मायभूमीसाठी चोवीस तास खडा पहारा…. तब्बल २८ वर्षे लष्करातील कडक सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले खर्डे येथील सैनिक दत्तात्रय पवार आपल्या मायभूमी दाखल होताच स्वागताला आलेले सारे गाव पाहून चकीत झाले….भूमिपुत्राचा आपल्या गावाला पदस्पर्श होताच साऱ्या गावाने आपल्या या लाडक्या भूमिपुत्राची जंगी मिरवणूक काढत त्याच्या देशसेवेला जंगी सलामी दिली.
गावकऱ्यांनी केलेल्या या जंगी स्वागतामुळे दत्तात्रय यांचा केवळ ऊरच भरून आला नाही तर जवानांबद्दल नागरिकांना असलेल्या आत्मीयतेने त्यांची पोलादी छाती फुलून गेली.
दत्तात्रय पवार सैन्यदलात भरती झाल्यानंतर त्यांनी आर्मी डिफेन्समधून देवळाली कॅम्प, जम्मू-काश्मीर, पुणे, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हिमाचल, प. बंगाल, जबलपूर, अहमदनगर, लेह-लडाख, गोवा, नागापूर (पुलगाव), केरळ येथे सेवा केली. आपल्या २८ वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर दोन जानेवारीला त्यांचे गावात आगमन झाले. सैन्य दलासाठी आपल्या घरादारापासून दूर राहणाऱ्या आपल्या लाडक्या जवानाने गावात पाऊल ठेवताच पवार यांच्या मित्रपरिवार व नातेवाइकांनी मिरवणुकीद्वारे जल्लोषात स्वागत केले.
गावातील महिलांनी या लष्करीपुत्राचे मनोभावे औक्षण केले. यावेळी गावातील काही माजी सैनिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे पदाधिकारी, संचालक यांच्यासह सारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांनी नंतर पवार, त्यांची पत्नी आणि कुटुंबांतील सदस्यांची खास गाडीतून वाजतगाजत मिरवणूक काढत त्यांच्या लष्करी सेवेला मानाची सलामी दिली.