नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका

नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका
Published on
Updated on

देवगाव : (जि. नाशिक) तुकाराम रोकडे

विविध ठिकाणी बंधबिगारीकरिता घेऊन गेलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कातकरी समाजातील अल्पवयीन मुले-मुलींची प्रशासन व श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सुटका करून रविवारी (ता. १८) घोटी पोलिस ठाण्यातून पालकांना ताबा देण्यात आला. आपल्या आईवडिलांच्या कुशीत ही मुले विसावताना पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच श्रमजीवी संघटनेने संबंधित पालकांना वेठबिगारीचा फास कायमचा तोडून टाकण्याचे आवाहन केले.

इगतपुरी तालुक्यातील गौरी आगीवले प्रकरण उघडकीस आल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून पोलिस तसेच जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा खडबडून जागी झाली होती. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी मागील आठवड्यात याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी तसेच संगमनेर येथील कार्यालयात बैठक घेत याबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याची सूचना केली होती.

अल्पवयीन मुलांना दोन अडीच हजारांत विक्री केल्याची घटना उघडकीस आणत दैनिक 'पुढारी'ने याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी होत संगमनेरमधील तीन आरोपी, पारनेरमधील चार आरोपींवर गुन्हे दाखल होऊन अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत बंधबिगारीतून २२ मुले मुक्त करण्यात आले. संबंधित कुटुंबीयांना तातडीने शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, घरकुल आदी शासकीय सुविधा देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली.

मुक्त मुलांना शिक्षणाकामी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून निवासी वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. मेंढपाळ, वीटभट्टी आदी व्यावसायिकांना तंबी देत यापुढे कोणाकडेही असल्यास अल्पवयीन मुले संबंधित पोलिस ठाण्यात पाठवत आई-वडिलांच्या ताब्यात देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले विवेक पंडित यांनी प्रशासनास दिल्या आहेत.

मुक्त केलेल्या मुलांना पालकांच्या स्वाधीन करताना श्रमजीवीचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे, तालुकाध्यक्ष गोकुळ हिलम, सचिव सुनील वाघ, राजू वाघ, पोलिस उपनिरीक्षक संजय कवडे, संगमनेरचे सहायक पोलिस निरीक्षक सैयद जबिर, घोटी पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक शिवाजी जुंद्रे, पोलिस शिवाजी शिंदे, पारनेर पोलिस ठाण्याचे महादेव पवार, पल्लवी गोरे, पारनेर वनकुठेचे सरपंच ॲड. राहुल झावरे, बाळासाहेब पोकळे, गृहरक्षक दलाचे संपत गोरे, अरुण देवरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news