नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
शासन कोट्यवधींचा निधी देऊन योजना राबवत असताना केवळ प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे उद्देश असफल होतोय. तरी येत्या दोन दिवसांत मनपा, पोलिस आणि महसूल विभागाने कुसुंबा, जुना आग्रा रोडसह प्रमुख मार्ग अतिक्रमणमुक्त करावेत, अन्यथा त्यानंतर आम्ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवू. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा निर्वाणीचा इशारा माजी महापौर शेख रशीद यांनी दिला आहे.
हजारखोलीमधील संपर्क कार्यालयात बुधवारी (दि.1) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मनपा व पोलिस अधिकार्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. कुसुंबा व जुना आग्रा रोडचा विकास साधला जात असताना त्यास अतिक्रमणाचा अडथळा निर्माण झाला आहे. पोलिस बंदोबस्त देत नाही आणि मनपा प्रशासनही स्वस्थ बसते. या प्रकारामुळे म्हाळदे-सायनेत राबवलेल्या आयएचएसडीपी योजनेतील घरकुल नाईलाजास्तव प्रधानमंत्री आवास योजनेकडे वर्ग करण्याची वेळ ओढवली. या घरकुल योजनेत राजकारण झाले असले तरी प्रशासनाने त्यांचे कर्तव्य बजावायला हवे होते. ते झाले नाही. तरी येत्या दोन दिवसांत प्रशासनाने प्रमुख मार्ग अतिक्रमणमुक्त न केल्यास ते आम्ही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह हटवू. त्यानंतरच्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शेख यांनी यावेळी दिला. अतिक्रमणांच्या आडून अवैध धंदे चालतात. त्यातून हफ्ते मिळतात, तेव्हा पोलिस कशी कारवाई होऊ देणार, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
.. हे तर वरचढ
विद्यमान आयुक्त भालचंद्र गोसावी हे तत्कालीन वादग्रस्त आयुक्त त्र्यंबक कासार यांच्यापेक्षाही वरचढ निघाले. आठवड्यातून एक – दोन दिवसच कार्यालयात हजेरी लावतात. नेहमी मंत्रालयात बैठका करतात. तेच नाही मग मुख्यालयातही शुकशुकाट होतो. अशाने नागरी प्रश्न कसे निकाली निघणार, असा सवाल शेख यांनी करित 'तेव्हाचे काँग्रेस शासन असते तर..' असा संकेतात्मक किस्साही सांगितला.