नाशिक : पुढारी वृत्तसेवा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांची मोफत तयारी करून घेतली जाते. मात्र, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सराव परीक्षा प्रशिक्षण केंद्र नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विभागीय स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचे साकडे काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून अनुसूचित जाती कल्याण समितीला निवेदनाद्वारे घातले.
गेल्या दोन दिवसांपासून अनुसूचित जाती कल्याण समिती नाशिक दौर्यावर आली असून, समितीच्या अध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देण्यात आलेउत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पुणे किंवा नागपूर येथे जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणे अशक्य होत आहे. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांचा अभ्यासावर दूरगामी परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर कुसुम चव्हाण, माया काळे, विलासराज बागूल, अॅड. विकास पाथरे, इसाक कुरेशी, प्रा. प्रकाश खळे, अमोल मरसाळे, मच्छिंद्र दोंदे आदींची नावे व स्वाक्षर्या आहेत.