नाशिक : रक्ताच्या नात्याने झिडकारले अन् माणुसकीने स्वीकारले

नाशिक : अंत्ययात्रेसाठी फुलांनी सजविण्यात आलेला वैकुंठ रथ.
नाशिक : अंत्ययात्रेसाठी फुलांनी सजविण्यात आलेला वैकुंठ रथ.
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके
तब्बल आठ महिन्यांपासून मनपाच्या बेघर निवारा केंद्रात आश्रयाला असलेल्या व्यक्तीचे आजारपणाने निधन होते… नातेवाइकांशी संपर्क साधला जातो…परंतु आम्ही येऊ शकत नाही, अंत्यविधी उरकून घ्या, असे उत्तर येते… आणि मग मनपा कर्मचारी, अन्य बेघर व्यक्ती आणि श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थेचे पदाधिकारीच या व्यक्तीचे खांदेकरी होऊन अंत्यविधी पार पाडतात… मनाला चटका लावणारी ही घटना शनिवारी (दि.6) दुपारी पंचवटीतील बेघर निवारा केंद्रात घडली. समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन या घटनेतून घडले.

तपोवन येथील महापालिकेच्या एकमेव बेघर केंद्रात राजूभाई ठक्कर (73, रा. मुंबई) हे पत्नीसह राहात होते. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर दोन दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. लिव्हरचा त्रास बळावल्याने शुक्रवारी (दि.5) रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता अंत्यविधीस येण्यास त्यांनी सपशेल नकार दिला. एखाद्या बेवारस व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुठल्याही सरकारी दवाखान्यामध्ये त्याची बेवारस म्हणून नोंद होते व शीतगृहामध्ये त्यांना ठेवण्यात येते व काही दिवसांनी जमेल तसा त्यांचा अंत्यविधी पार पडतो. मात्र, कोणत्याही बेघर व्यक्तीच्या बाबतीत असे होऊ नये, हा विचार समोर ठेवून बेघरांचे संगोपन करणार्‍या श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थेचे पदाधिकारी आणि मनपा कर्मचारी यांनी सर्व सोपस्कार पार पाडून त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. स्वामीनारायण मंदिर यांचा वैकुंठ रथ बोलावून तो फुलांनी सजवून निवारा केंद्र येथे हिंदू रीतीरिवाजानुसार विधी पूर्ण करण्यात आले. नंतर सर्वांनी या व्यक्तीला खांदा देत पंचवटी अमरधाम येथे अंत्यविधी पार पाडला. 'रक्ताच्या नात्याने जरी झिडकारले, तरी माणुसकीच्या नात्याने मात्र स्वीकारले', असा प्रत्यय या घटनेतून आला. यावेळी मनपाचे 'डीएवायएनयूएलएम' विभागातील शहर अभियान व्यवस्थापक रंजना शिंदे, श्रीरामकृष्ण आरोग्य संस्थेचे स्वामी विश्वरूपानंद व संदीप कुयटे, संजय गोहील, प्राजक्ता कुलकर्णी, राजूभाई कोठारी, जगदीश ठक्कर, दिलीप ठक्कर, बेघर निवारा केंद्रातील देवेंद्र ठोके, राजू साबळे, जगताप काका व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

बेवारस व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दवाखान्यात त्याची बेवारस म्हणून नोंद होते. बेवारसांसाठी असणार्‍या शीतगृहामध्ये शव ठेवण्यात येते. काही दिवसांनी जमेल तसा त्यांचा अंत्यविधी पार पडतो. परंतु, तत्पूर्वी, त्या शवाची हेळसांड होते. बेघर निवारा केंद्रातील एकाही व्यक्तीची मृत्यूनंतर अशी हेळसांड होऊ नये, या माणुसकीच्या भावनेने आम्ही हा अंत्यविधी पार पाडला. – स्वामी विश्वरूपानंद, श्रीरामकृष्ण आरोग्य संस्था.

आता आम्हीच आधाराची काठी
मृत राजूभाई ठक्कर व त्यांची पत्नी हे गेल्या आठ महिन्यांपासून मनपाच्या निवारा केंद्रात दाखल झाले होते. त्यापूर्वी त्या दोघांनी अनेक दिवस गोदाघाटावर उघड्यावर काढले. मनपाच्या निवारा केंद्राबाबत माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी आश्रय घेतला होता. मृत राजू ठक्कर यांच्या पत्नीच्या पायाची शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना आधाराशिवाय चालता येत नाही. पतीच त्यांच्या आधाराची काठी होते. परंतु, त्यांच्या अकाली निधनाने आधारच गेल्याने त्या फार व्यथित झाल्या. त्यावर आम्ही तुमचा आधार बनून राहू, असा धीर केंद्रातील अन्य बेघरांनी त्यांना दिला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news