नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
कांदा, टोमॅटोनंतर मिरचीच्या बाजारभावात घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लाखो रुपये खर्च करून मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने अक्षरशः मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
निफाड तालुक्यातील लासलगावजवळील वेळापूर येथील शेतकरी एकनाथ कुटे यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये आरमार जातीच्या मिरचीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी सात ते साडेसात हजार रुपये लावून त्याला मल्चिंग पेपर व बांबू यासह रासायनिक खते असा एकूण दोन ते अडीच लाख रुपये उत्पादनासाठी खर्च केला. मात्र, मिरची निघण्यास सुरुवात झाली. त्यावेळी बाजारात 15 ते 20 रुपये भाव मिळू लागल्याने अक्षरशः या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाल्याने कांद्याप्रमाणेच मिरचीलाही वीस ते पंचवीस रुपये किलोला अनुदान द्यावे, अशी मागणी उत्पादक शेतकरी कुटे यांनी केली आहे. इतके काबाडकष्ट करून पोटच्या पोराप्रमाणे मिरचीचे पीक घेतले. त्याला दहा ते पंधरा रुपये इतका बाजारभाव मिळतोय. मात्र, हीच मिरची व्यापाऱ्याकडून घ्यायला जर गेले तर 60 ते 70 रुपये किलोला मोजावे लागतात. तसेच लाल मिरची व्यापारी आमच्याकडून दीडशे ते दोनशे रुपये किलोने घेतात. तीच मिरची व्यापाऱ्याकडून घेतली तर साडेतीनशे ते चारशे रुपये किलोप्रमाणे विक्री करतात. यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी महिला शेतकरी अर्चना कुटे यांनी केली आहे.