नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली इलेक्ट्रिक बाइक पेटून त्यामुळे लागलेल्या आगीत रहिवाशांच्या सात दुचाकी जळून खाक झाल्याची घटना येथील पाथर्डी फाटा परिसरात घडली. आनंदनगरच्या मल्हार सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोमवारी रात्री ही आग लागली. संबंधित इलेक्ट्रिक बाइकचा मालक बाहेरगावी गेला होता. या बाइकमधून स्पार्किंग होत असल्याची बाब लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याचे पर्यवसान आगीत झाले व लाखोंचे नुकसान झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हार सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोमवारी (दि.16) मध्यरात्री 2 ला आग लागली. आगीचे लोळ तिसर्या मजल्यापर्यंत गेल्याने अनेक सदनिकांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग विझविली.