नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अटी-शर्तींच्या जाचात अडकलेल्या महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाची नियमावली प्रेक्षक आणि कलाकारांसाठी त्रासदायक ठरत होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पदाधिकार्यांसोबत शुक्रवारी (दि. 9) बैठक बोलावण्यात आली होती. त्यानुसार महाकवी कालिदास मंदिर नाट्यगृहाबाबत आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत नियमावलीत योग्य ते बदल करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.
अखिल भारतीय परिषदेच्या वतीने दर दोन वर्षांनी वि. वा. शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर व बाबूराव सावंत पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कार समारंभासाठी कालिदास कलामंदिर विनामूल्य उपलब्ध करून द्यावे. कोविड साथीचा प्रत्येक क्षेत्राला फटका बसला त्यातून बाहेर पडण्यासाठी पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी भाडेदरात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. तशी सवलत कालिदास कलामंदिर येथे देण्यात यावी. नियमित स्वच्छता होऊनदेखील स्वच्छतागृहातून दुर्गंधी येत असल्याने त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी. कोविड साथीनंतर उपाहारगृह अद्याप सुरू झालेले नसून ते सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. यावेळी बैठकीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे, विशाल जातेगावकर, आदिती मोराणकर उपस्थित होते.