नाशिक ड्रग्ज प्रकरणात छोटा राजन टोळीचा संबंध | पुढारी

नाशिक ड्रग्ज प्रकरणात छोटा राजन टोळीचा संबंध

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : नाशिकमध्ये तयार करणार्‍या एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जचा मुख्य सूत्रधार ललित पाटील याच्यासह त्याचा लहान भाऊ भूषण पानपाटील व मित्र अभिषेक बलकवडे यांचा थेट संबंध पोलिसांनी उजेडात आणला आहे. पुणे पोलिसांनी नेपाळ सीमेजवळील बाराबंकी-गोरखपूर रोड येथून भूषण व अभिषेकला अटक केली असून त्यांचा एमडी ड्रग्ज तयार करण्यापासून वितरणातील सहभाग तपासत आहेत. या त्रिकुटाने छोटा राजन टोळीतील गुन्हेगारांशी संपर्क साधून ड्रग्ज बनवल्याचेही समोर आले आहे.

पुणे येथील ससून रुग्णालयातून 2 ऑक्टोबर रोजी फरार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे छोटा राजन गँगशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहेत. छोटा राजनचे साथीदार तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर यांच्या संपर्कात राहून ललितने एमडी बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे समोर येत आहे. नायजेरियन व्यक्तीमार्फत त्याने एमडी ड्रग्ज बनवण्याचा फॉर्म्युला शिकत स्वत:चा कारखाना टाकून ड्रग्ज बनवण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी पुणे येथील कारखान्यावर कारवाई करीत संशयितांची धरपकड केली. त्यानंतर ललितने भूषणला शिंदे गावात कारखाना सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार भूषणने कारखाना सुरू करून एमडी ड्रग्ज बनवण्यास सुरुवात केली. अभिषेकच्या माध्यमातून ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याचे समोर येत आहे.

भूषण पाटीलच मास्टरमाईंड

भूषण पाटील हा ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख मास्टरमाईंड आहे. तो केमिकल इंजिनिअर असून तोच ड्रग्ज तयार करत होता. ते विकण्याचे काम ललित पाटील करत होता. अभिषेक बलकवडे हा भूषणसोबत आर्थिक बाबी पाहात होता.

Back to top button