Nashik : ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ साठी महापालिका लावणार ‘इतकी’ झाडे

Nashik : ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ साठी महापालिका लावणार ‘इतकी’ झाडे
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'हरित नाशिक, सुंदर नाशिक' अशी बिरुदावली मिरविण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ऑक्टोबर २०२३ पर्यंत शहरभर २० हजार वृक्षलागवड केली जाणार आहे. शहराच्या सहाही विभागांत ही लागवड केली जाणार असून, यामध्ये स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्याचबरोबर झाडांच्या देखभालीसाठी कंत्राटदारांचीही नेमणूक केली जाणार आहे.

दरवर्षी ही मोहीम राबविली जात असून, गेल्यावर्षी ५० हजार वृक्षलागवड करण्याचे उद्यान विभागाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १५ हजारच वृक्षलागवड केले गेल्याने यंदा २० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. 'हरित नाशिक' ही संकल्पना टिकवून ठेवण्यासाठी मनपाचा प्रयत्न असला तरी, गेल्या काही वर्षांत मनपातील सत्ताधाऱ्यांकडून रस्ते, उड्डाणपूल, भूसंपादन तसेच अन्य बाबींना अवास्तव महत्त्व दिल्याने 'हरित नाशिक' या संकल्पनेलाच हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. यंदा मात्र २० हजार झाडे लावण्याचे ध्येय ठेवून महापालिकेचा उद्यान विभाग काम करणार आहे. महापालिकेची रोपवाटिका तसेच वन विभागाकडून झाडे आणली जाणार असून, सर्व देशी झाडे असणार आहेत. त्यामध्ये वड, पिंपळ, जांभूळ, बहावा, कदम, हिरडा, आंबा, सिसर, मोह, कडुलिंब यांचा समावेश आहे.

शहरातील रस्त्यांच्या कडेला तसेच मोकळ्या भूखंडांवर वृक्षारोपण केले जाणार आहे. रस्त्यांच्या कडेला लागवड केलेल्या रोपांना जगविण्यासाठी कंत्राटदार नेमले जाणार आहेत. तर मोकळ्या भूखंडांवरील रोपांच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक नागरिकांवर सोपविली जाणार आहे. या मोहिमेत काही संस्थांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. २० हजारांपैकी ८० टक्के रोपे जगविण्याचा उद्यान विभागाचा प्रयत्न असणार आहे.

एका रोपासाठी २६०० रुपये मोजणार

रस्त्यांच्या कडेला लागवड केलेल्या रोपांच्या देखभालीसाठी कंत्राटदारांची नेमणूक केली जाणार असून, तीन वर्षे या रोपांची देखभाल कंत्राटदारांच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका कंत्राटदारांना प्रतिरोप २६०० रुपये मोजणार आहे. एखादे रोप जगविण्यात कंत्राटदार अपयशी ठरल्यास, नव्याने त्या वृक्षाचे रोपण करून त्याची देखभाल कंत्राटदारास करावी लागणार आहे.

विभागानुसार वृक्षलागवड

विभाग – रोपांची संख्या

नाशिक पूर्व – २०००

नाशिक पश्चिम – १५००

सिडको – ४५००

सातपूर – ४५००

पंचवटी – ४५००

नाशिकरोड – ३०००

यंदा वीस हजार वृक्षलागवड केली जाणार असून, या मोहिमेत काही संस्थांना तसेच सुजाण नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. 'हरित नाशिक' ही बिरुदावली आणखी घट्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऑक्टोबर २०२३ पर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे.

– विजयकुमार मुंडे, उपआयुक्त, उद्यान

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news