नाशिक : आता शनिवारीसुध्दा मनपा खातेप्रमुखांची बैठक; निर्णयावर सोमवारी अंमलबजावणी

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news
नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ आधीच कमी. त्यात एक-एका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर दोन-तीन कामांचा प्रभारी कारभार असल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. असे असताना आता नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पलकुंडवार यांच्या निर्णयामुळे अधिकाऱ्यांना आठवड्यातील दर सोमवारी होणारी खातेप्रमुखांची बैठक शनिवारी सुट्टीच्या दिवशी घेतली जाणार आहे. यामुळे अधिकाऱ्यांना सुट्टीच्या दिवशीही कामावर यावे लागणार आहे.

नाशिक महापालिकेत ७०८३ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. यापैकी जवळपास अडीच हजार कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने साडेचार हजार कर्मचाऱ्यांवर महापालिकेचा कारभार सुरू आहे. एकीकडे शहराचा विस्तार वाढत असल्याने शहरवासीयांना पायाभूत तसेच मूलभूत सेवा देण्याकरता आवश्यकता असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या मात्र अपुरी आहे. महापालिका प्रशासनाचा कारभार करण्याबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, विविध अभियान, मोहीम यांचा प्रचार यामुळे अधिकारी व कर्मचारी आधीच मेटाकुटीला आले आहेत. आजमितीस अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने संबंधित विभागांचे प्रभारी कामकाज आहे त्या अधिकाऱ्यांना पाहावे लागत आहे. कर्मचाऱ्यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. अर्थात, सर्वच कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात असे नाही. परंतु, जीव तोडून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच या सर्व प्रकाराचा ताण सहन करावा लागत असल्याने रिक्त पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता तर अधिकाऱ्यांना सुट्टीच्या चार शनिवारपैकी पहिला, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सोमवारऐवजी खातेप्रमुखांची बैठक घेतली जाणार आहे. यामुळे या दिवशी अधिकाऱ्यांचा दिवस जाणार असल्याने बाहेरगावी कुटुंब असलेल्या अधिकाऱ्यांना आता गावी जाणेही कठीण होणार आहे.

सोमवारी निर्णयांवर अंमलबजावणी

महापालिकेत आजवर आयुक्तांकडून दर सोमवारी खातेप्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेतला जातो. परंतु, आता या दिवशी केवळ महत्त्वाच्या कामांचा आढावा आणि त्यावरील अंमलबजावणी याबाबतच चर्चा आणि आढावा घेतला जाणार आहे. सोमवार हा आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने आढावा बैठकीसाठी चार ते पाच तास जात असल्याने नागरी कामे खोळंबून राहतात. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना महत्त्वाची कामे करता येत नाही. सुट्टीच्या दिवशी शनिवारी खातेप्रमुखांचा योग्यप्रकारे आढावा घेता येऊ शकतो या उद्देशाने आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी शनिवारी आढावा बैठक घेण्याचे ठरविले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news