नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये नराधमांनी अल्पवयीन मुलीसह ब्यूटीपार्लरमध्ये शिरून महिलेवर अत्याचार केला होता. या प्रकरणांमध्ये न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रवीण प्रकाश किरवे (रा. वीर सावरकरनगर, जेलरोड) आणि नितीन सुभाष पवार (३३, रा. श्रीरामनगर, सिडको) अशी आरोपींची नावे आहेत.
पहिल्या घटनेत प्रवीण किरवे याने जुलै ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत अल्पवयीन मुलीला धमकावत, दमदाटी करीत वारंवार अत्याचार केला होता. पीडितेस जिवे मारण्याची धमकी देत त्याने ओमनगर व नांदूर नाका येथे अत्याचार केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने प्रवीणविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराची फिर्याद दाखल केली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक संध्या तेली यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सात साक्षीदार तपासले. प्रवीणविरोधात परिस्थितिजन्य पुरावे व साक्षीदार यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. मलकापट्टे रेड्डी यांनी प्रवीणला जन्मठेप व 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक के. के. गायकवाड, पोलिस अंमलदार पी. आय. खान यांनी कामकाज पाहिले. तर दुसऱ्या घटनेत नितीन पवार याने २७ सप्टेंबर २०२१ ला सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास सिडकोतील पवननगर येथील एका ब्यूटीपार्लरमध्ये शिरून महिलेस चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला होता. पीडितेस जिवे मारण्याची धमकी देत नितीन फरार झाला होता. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक यू. आर. सोनवणे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. अपर्णा पाटील व एस. एस. गोरे यांनी कामकाज पाहिले. नितीनवरील आरोप सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. खरात यांनी नितीनला जन्मठेप व तीन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस शिपाई सी. एम. सुळे, पी. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले.