कुंभमेळा नाशिक,www.pudhari.news
कुंभमेळा नाशिक,www.pudhari.news

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ आराखडा पाच हजार कोटींवर जाणार

Published on

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Nashik Kumbh Mela)  महापालिकेतील विविध विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या कामांच्या प्रस्तावांची जुळवाजुळव सुरू झाली असून, या विभागांचा एकत्रित प्रारूप सिंहस्थ आराखडा पाच हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. सिंहस्थांतर्गत हाती घेतल्या जाणाऱ्या कामांसाठी अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष 'फिल्ड'वर जाऊन माहिती घेतली जात असल्याने आराखडा तयार करण्यासाठी आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशकात येत्या २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा  होत आहे. सिंहस्थकाळात साधु-महंतांसह सुमारे एक कोटी भाविक नाशिकला येण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत ५४ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. उर्वरित सुमारे तीनशे एकर जागा भाडेतत्वावर अधिग्रहीत केली जाणार आहे. साधुग्राममध्ये रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आदी मुलभूत सुविधांसह आरोग्य व वैद्यकीय सेवा पुरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर सिंहस्थानिमित्त शहरातील बाह्य, अंतर्गत रिंगरोड विकसित केले जाणार असून अंतर्गत रस्ते विकासालाही प्राधान्य दिले जाणार आहे. वैद्यकीय विभागामार्फत अस्तित्वातील रुग्णालयांचे सक्षमीकरण करतानाच नवीन रुग्णालये, तात्पुरते ३० टेन्ट दवाखाने उभारले जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागातर्फे नवीन जलशुध्दीकरण केंद्रे, गंगापूर व दारणा धरण थेट पाईपलाईन योजनेसह नव्याने विकसित झालेल्या भागात नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. मलनिस्सारण विभागातर्फे अस्तित्वातील मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण, अद्यावतीकरणासह मलवाहिकांचे जाळे विकसित केले जाणार आहेत. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अग्निशमन विभागाची भूमिकाही महत्वाची असल्याने या विभागांतर्गत नवीन अग्निशमन केंद्रे, अग्निशमन बंब तसेच अग्निप्रतिबंधक साहित्यांची खरेदी केली जाणार आहे. सिंहस्थकाळात भाविक व शहरातील नागरिकांचे आरोग्य जपण्याची प्रमुख जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाची असल्याने रस्ते सफाई तसेच अन्य बाबींकरीता खर्च केला जाणार आहे. यासह अन्य विभागांनाही सिंहस्थ कामांमध्ये समाविष्ट केले जाणार असल्याने या विभागांना सिंहस्थ कामांचा प्रारूप आराखडा सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले होते. सिंहस्थ आराखड्यासाठी समन्वयक म्हणून अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रारूप प्रस्ताव सादर करण्यासाठी २५ आॉगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती. सिंहस्थ कामांसाठी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन अधिकाऱ्यांना माहिती घ्यावी लागत असल्याने प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रारूप सिंहस्थ आराखडा आयुक्तांना सादर केला जाणार आहे. 

बांधकाम विभागाचा वाटा सर्वाधिक

सिंहस्थ कामांमध्ये महापालिकेच्या बांधकाम विभागाचा सहभाग सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे सिंहस्थ आराखड्यातील खर्चातही बांधकाम विभागच आघाडीर असणार आहे. त्याखालोखाल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वैद्यकीय, आरोग्य, अग्निशमन, मिळकत विभागाची कामे असणार आहेत.

सिंहस्थ आराखड्यातील खर्चाचे संभाव्य आकडे-

बांधकाम विभाग – २५०० कोटी

पाणीपुरवठा विभाग- १००० कोटी

मलनिस्सारण विभाग- ६२७ कोटी

आरोग्य-वैद्यकीय- ४५० कोटी

अग्निशमन- ३५० कोटी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्याकरीता अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन माहिती घ्यावी लागत असल्याने प्रस्ताव सादर करण्यासाठी खातेप्रमुखांना आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याअखेर प्रारूप आराखडा आयुक्तांना सादर केला जाईल.

– प्रदीप चौधरी, सिंहस्थ समन्वय अधिकारी, तथा अतिरीक्त आयुक्त, मनपा.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news