नाशिक : गंगापूर धरणाचे आयुक्तांच्या हस्ते जलपूजन, निसर्ग कृपेबाबत घातले साकडे

नाशिक : गंगापूर धरणाच्या जलपूजन प्रसंगी धरणात नारळ वाहताना मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार(छाया- हेमंत घोरपडे)
नाशिक : गंगापूर धरणाच्या जलपूजन प्रसंगी धरणात नारळ वाहताना मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार(छाया- हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाचे मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सोमवारी (दि.२६) विधीवत जलपूजन करण्यात आले. पूजा झाल्यानंतर धरणाच्या पाण्यामध्ये आयुक्तांच्या हस्ते श्रीफळ वाहण्यात आले. तसेच धरणाच्या पुलाजवळ असलेल्या मारुतीचेही पूजन करण्यात आले.

धरण तसेच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जलपूजनाचा सोहळा परंपरेने साजरा केला जातो. यंदा प्रशासकीय राजवट लागू असल्याने लोकप्रतिनिधींच्या हस्ते जलपूजन झाले नाही. अन्यथा दरवर्षी महापौरांसह त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते जलपूजन केले जाते. नाशिक शहरावर निसर्गाची अशीच कृपा असो, अशा प्रकारचे साकडे आयुक्तांनी धरणासह वरूण राजाला घातले. पूर्ण भरलेल्या धरणाचा जलसाठा पाहून उपस्थित सर्वांनीच आनंद व्यक्त केला. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे ५.६ टीएमसी क्षमतेचे गंगापूर धरण आशियातील पाहिले मातीचे धरण आहे.

मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे, उपायुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, मुख्य लेखापरीक्षक बोधिकिरण सोनकांबळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, बी. जी. माळी, रवींद्र धारणकर, जितेंद्र पाटोळे, संदेश शिंदे, आयटी विभाग संचालक नितीन धामणे, विभागीय अधिकारी कैलास राबडीया, मदन हरिश्चंद्र, जयश्री बैरागी, सुनील आव्हाड, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम आदी मनपा अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

(सर्व छायाचित्रे-हेमंत घोरपडे)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news