नाशिक : कळवण ग्रामपंचायतीत मतदारांची युवांना पसंती
नाशिक ( कळवण) : पुढारी वृत्तसेवा
कळवण तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतीचे थेट सरपंच बिनविरोध झाले आहे. तर 19 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी, दि.19 मतमोजणी होवून 89 जागेवर उमेदवार निवडून आले आहे. आज झालेल्या मतमोजणीत 89 जागांसाठी मतमोजणी होत बहुसंख्य ठिकाणी परिवर्तन पहावयास मिळत असून मतदारांची युवा उमेदवारांना पसंती असल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे.
सोमवारी, दि.19 सकाळी 10 वाजता पंचायत समिती सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी एकामागून एक 22 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीस फक्त 3 तास अवधी लागला. सभागृहाबाहेर उमेदवार हितचिंतकांनी मोठी गर्दी केली. मतदानाची वाढलेली टक्केवारी हि परिवर्तनाला संधी देत असल्याचा इतिहास आज खरा ठरला असून तब्बल 80 टक्के मतदान झाल्याने बहुसंख्य ठिकाणी परिवर्तन होवून तरुण उमेदवारांना मतदारांनी संधी दिली आहे. यावेळी तहसीलदार बंडू कापसे, मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. कळवण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक समाधन नागरे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

