नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिककरांना नव्या आर्थिक वर्षात खुशखबर आहे. ती म्हणजे नाशिक महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वेळीच भरणाऱ्यांना मालमत्ता व पाणीपट्टी करामध्ये लागू केलेल्या कर सवलत योजनेत मोठी सूट जाहीर केली आहे. त्यानुसार एप्रिलमध्ये कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना आता पाच टक्क्याऐवजी तब्बल आठ टक्के सूट मिळणार असून, या निर्णयाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे.
महापालिकेच्या महसुलात वाढ व्हावी यादृष्टीने महापालिकेने कर सवलत योजना लागू केली आहे. यामुळे अनेक करदाते सवलत योजनेच्या कालावधीतील एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात आपला कराचा भरणा करून सवलतीचा लाभ घेत असतात. जुन्या कर सवलत योजनेत एप्रिल, मे आणि जून महिन्यात मालमत्ता कर व पाणीपट्टीचा भरणा केल्यास अनुक्रमे पाच, तीन आणि दोन टक्के सवलत मिळत होती. आता नव्याने लागू झालेल्या कर सवलत योजनेनुसार आठ, सहा आणि तीन टक्के इतकी सवलत मालमत्ताधारकांना मिळणार आहे.
नळजोडणीधारकांनी ई-पेमेंटव्दारे (आॉनलाईन) दिलेल्या मुदतीत देयकाप्रमाणे थकबाकीच्या चालू मागणीसह संपूर्ण कर रक्कमेचा भरणा एक रक्कमी केल्यास अशा नळजोडणीधारकांना १ टक्का किंवा जास्तीत जास्त ५०० रूपये यापैकी जे कमी असेल त्याची सूट मिळणार आहे.
आॉनलाईन भर भरल्यास ५ टक्के सूट
नवीन कर निर्धारणात आलेल्या मिळकतींना ही सवलत लागू होणार असून, जून ते मार्च या कालावधीत कर निर्धारणात समाविष्ठ झालेल्या नवीन मालमत्तांना तीन टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. आॉनलाईन कराचा भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना पाच टक्के किंवा जास्तीत जास्त ३ हजार यापैकी जे कमी असेल त्या रक्कमेची सवलत मिळणार आहे. याआधी एक टक्का किंवा जास्तीत जास्त ५०० रूपये सूट मिळायची.
यासाठी देखील मिळणार सूट
मनपाकडून यापूर्वी सौर उर्जेचा वापर करणाऱ्या मालमत्ताधारकांना पाच टक्के सवलत दिली जायची. आता यात सौर उर्जेबरोबरच सोलर पॉवर प्लँट कार्यान्वित असलेल्या गृहनिर्माण संस्था वा निवासी प्रकल्प तसेच पावसाच्या पाण्याची साठवण तथा रेनवॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी पुनर्वापर उपाययोजना व इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित असलेल्या गृहनिर्माण संस्था वा निवासी प्रकल्पांना देखील पाच टक्के सूट मिळणार आहे. मात्र यापैकी कोणतीही एकच प्रकारची सूट गृहनिर्माण संस्थाना घेता येणार आहे.
हेही वाचा :