नाशिक : कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने दोघांना 10 लाख रुपयांचा गंडा

नाशिक : कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने दोघांना 10 लाख रुपयांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुंतवणुकीसह कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने शहरातील दोघांना भामट्यांनी सुमारे १० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गंगापूर आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांत संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अजिंक्य बाळासाहेब घुगे (२४, रा. अशोकस्तंभ) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित राकेश बापूसाहेब पानपाटील (४०, रा. पाइपलाइन रोड, गंगापूर) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. घुगे यांच्या फिर्यादीनुसार, डिसेंबर २०२१ ते जून २०२३ या कालावधीत पानपाटील यांनी चार लाख ६५ हजार रुपयांचा गंडा घातला. प्रभाग क्रमांक सहामध्ये मखमलाबाद येथील नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्याचे काम मिळवून देतो, असे सांगत पानपाटील याने घुगेंकडून पैसे घेतले होते. तसेच बांधकामाची खोटी वर्कऑर्डर घुगे यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवून फसवणूक केली. घुगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गंगापूर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत मनीषा रमेश आरोटे (रा. देवळाली कॅंप) यांना संशयित प्रशांत सनासे व प्रिया सनासे (दोघे रा. मोरवाडी, सिडको) यांनी पाच लाख रुपयांचा गंडा घातला. मनीषा यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान गंडा घातला. दुर्वांकुर मेकाट्रॉनिक्स कंपनीत भागीदार होण्यास प्रवृत्त करीत दोघांनी मनीषा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र संशयितांनी मनीषा यांना कंपनीत भागीदार केले नाही किंवा पैसेही परत केले नाहीत. याबाबत मनीषा यांनी देवळाली कॅम्प पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून दाेघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news