नाशिक : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेतून असंघटितांना बळ : निश्चल कुमार नाग

नाशिक : असंघटित कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन कार्ड वितरित करताना निश्चलकुमार नाग, विजय कृष्णन्, विकास माळी, नीलेश फिरके, निखिल कोठावदे आदी.
नाशिक : असंघटित कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन कार्ड वितरित करताना निश्चलकुमार नाग, विजय कृष्णन्, विकास माळी, नीलेश फिरके, निखिल कोठावदे आदी.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशात असंघटित कामगारांचे प्रमाण अधिक असून, त्यांच्या कल्याणार्थ शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकीच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असून, ही योजना असंघटितांना बळ देणारी ठरेल, असे प्रतिपादन ईएसआयसीचे उपसंचालक निश्चल कुमार नाग यांनी केले.

सातपूर, त्र्यंबक रोड येथील मुख्य कार्यालयात श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या निर्देशानुसार कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) आणि सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेबाबतची इत्यंभूत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. पुढे बोलताना निश्चल कुमार नाग यांनी सांगितले की, 'असंघटित कामगार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, निवृत्तीच्या वयानंतर त्याला दिलासा मिळेल, अशी तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. ही योजना प्रत्येक कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत असंघटित कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेत १८ ते ४२ वय असलेल्या कामगारांना सहभागी होता येणार आहे. तसेच कामगारांना दरमहा ८० रुपये भरावे लागणार आहेत. एखादा कामगार वयाच्या २५ व्या वर्षी या योजनेत सहभागी झाल्यास, ६० व्या वर्षापर्यंत त्याचे ३३ हजार ६०० रुपये जमा होणार आहेत. सरकारकडून इतकीच रक्कम त्याच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यामुळे त्या कामगारांच्या खात्यावर एकूण ६७ हजार २०० रुपये जमा होणार असून, त्यातून त्याला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला योजना सुरू ठेवता येणार आहे. तसेच एखादा लाभार्थी स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडल्यास, जमा झालेली रक्कम व्याजासह त्याला परत मिळणार आहे. कुठल्याही क्षेत्रातील असंघटित कामगारास या योजनेत सहभागी हाेता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पीएफ आयुक्त अनिल कुमार प्रितम, फॅक्टरी सल्ला सेवा आणि कामगार संस्था महासंचालनालयाचे संचालक विजय कृष्णन्, कामगार उपआयुक्त विकास माळी, सीएससीचे व्यवस्थापक नीलेश फिरके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, याप्रसंगी काही कामगारांना तत्काळ श्रमयोगी मानधन योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले. याप्रसंगी कामगारांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कामगारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सामाजिक सुरक्षा अधिकारी निखिल कोठावदे यांनी सूत्रसंचालन  केले व आभार मानले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news