नाशिक : तुम्ही काय आम्हाला पक्षनिष्ठा शिकवता? जाधव, नागरे, पाटील यांचा पलटवार

नाशिक : तुम्ही काय आम्हाला पक्षनिष्ठा शिकवता? जाधव, नागरे, पाटील यांचा पलटवार
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वीच सातपूर भाजप पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका ठेवत पक्षाने त्यांना पुन्हा संधी देऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली होती. तसेच माजी नगरसेविका पल्लवी पाटील, इंदुबाई नागरे यांनाही विरोध दर्शविला होता. आता या तीनही माजी नगरसेविकांनी एक पत्र प्रसिद्ध करून विरोधाला जशास तसे उत्तर दिले आहे. 'तुम्ही काय आम्हाला पक्षनिष्ठा शिकवता?' असा सवाल उपस्थित करीत आमदार सीमा हिरे यांच्यावर आरोपांची झोड उठवून दिली आहे. या पत्रामुळे सातपूरमधील पक्षांतर्गत धुसफुस आता चव्हाट्यावर आली आहे.

सातपूर विभागातील काही भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन शशिकांत जाधव, पल्लवी पाटील तसेच इंदुबाई नागरे यांना विरोध दर्शविला होता. त्यावर आता शशिकांत जाधव, इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील व विक्रम नागरे यांनी एक पत्र प्रसिद्ध करून स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आमदार सीमा हिरे यांचा समाचार घेतला आहे. पत्राच्या सुरुवातीलाच ज्या बैठकीची माहिती भाजपच्या शहर कार्यालयाला नाही, अशा बैठकीला आमदारांनी उपस्थित राहावे, हे कितपत योग्य? असा सवाल उपस्थित केला आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही जीवाचे रान करून पक्षाचे काम केले. याला प्रभाग १० मधील मतदार साक्षीदार असल्याचे सांगत, आपला प्रभाग सोडून सिडकोमध्ये जायचे आणि तिथे भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे तिकीट कापून स्वत:च्या मुलीला उभे करण्यासाठी प्रयत्न करायचे, यातून खरोखरच पक्ष वाढेल काय? याचा विचार आमदार सीमा हिरे यांनी करावा. कोणाला पक्षात ठेवायचे किंवा न ठेवायचे हे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, शहराध्यक्ष ठरवतील. त्यांना माहिती न देता परस्पर स्वत:च्या स्वार्थासाठी बैठक घ्यायची आणि आपल्या विद्यमान नगरसेवकांविरुद्ध षडयंत्र रचायचे, याला पक्षनिष्ठा म्हणतात काय? ज्या प्रभाग ८ मध्ये भाजप आमदारांचे निवासस्थान आहे, त्या प्रभागात एकही भाजपचा नगरसेवक नाही, अशात त्या ठिकाणी काम करायचे सोडून भाजपचे चार नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागात ढवळाढवळ करणे कितपत योग्य असा सवालही उपस्थित करण्यात आला.

आमच्यासारख्या कट्टर कार्यकर्त्यांमुळेच तुम्हाला आमदारकी मिळाली. रॅली, सभा, बूथरचना, मतदारयाद्यांची कामे हे सर्व तुम्ही विसरलात काय? आपल्या फोटोचे अल्बम तपासल्यास आपल्या मागे कोण उभे होते याचा साक्षात्कार होईल, असेही आमदार सीमा हिरे यांना उद्देशून पत्रात म्हटले आहे. तसेच या पत्रात माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्यावरही गद्दारीचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हे पत्र सध्या सातपूर परिसरात चांगलेच चर्चिले जात असून, या पत्रामुळे भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, याबाबत आमदार सीमा हिरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news