

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कुरापत काढून एकावर प्राणघातक हल्ला करीत त्याचे अपहरण करून त्याच्याकडील माेबाइल बळजबरीने घेऊन पसार झालेल्या चौघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-आग्रा रोडवर १३ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला असून, न्यायालयाच्या आदेशानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्पाक रफीक पठाण (२१, रा. विल्होळी गाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आनंद शिंदे (३५, रा. बजरंगवाडी, विल्होळी गाव) व इतर तिघांनी १३ ऑक्टोबरला मध्यरात्री १ वाजता मुंबई-आग्रा रोडवरील डी मार्ट मॉलच्या पाठीमागील परिसरात मारहाण केली. संशयित शिंदेने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर इतरांनी पठाण याचे अपहरण करून त्याच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला होता. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार न घेतल्याने पठाणने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.