

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आलेले महापालिकेचे पाचही जलतरण तलाव आता डागडुजीनंतर मंगळवार (दि. 19)पासून 100 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. त्यामुळे जलतरणपटूंसह सर्वसामान्यांना आता मनसोक्त पोहण्याचा आनंद घेता येणार आहे. तरण तलावांच्या शुल्कात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आधीच महागाई, त्यात ही वाढ खेळाडूंसह विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणारी आहे.
महापालिकेचे नाशिक पश्चिम विभागात स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, सातपूर विभागात जलतरण तलाव, नाशिकरोड विभागात राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, सिडकोत स्वामी विवेकानंद जलतरण तलाव आणि पंचवटीत स्व. श्रीकांत ठाकरे जलतरण तलाव हे पाच जलतरण तलाव आहेत. परंतु, कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होणार्या ठिकाणांसह जलतरण तलाव, स्पा, जिम, धार्मिक स्थळे, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, मनोरंजन स्थळे बंद केली होती. महापालिकेनेही दि. 15 मार्च 2020 पासून राज्य शासनाच्या आदेशानुसार पाच जलतरण तलावांसह हेल्थ सेंटर बंद केले होते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले होते.
परंतु, जलतरण तलाव मात्र बंदच होते. पहिल्या लाटेपाठोपाठ दुसरी लाट आल्याने पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसरी लाटही निष्प्रभ ठरली. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने सरकारने सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. शहरातही निर्बंध पूर्णपणे उठविल्याने मनपा आयुक्त पवार यांनी सर्वच जलतरण तलाव तसेच हेल्थ सेंटर 100 टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील पाचही जलतरण तलावांसाठी चालू वर्षी 10 टक्के शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, दर तीन वर्षांनंतर महापालिकेकडून शुल्काचा आढावा घेऊन शुल्कवाढ करण्याची तरतूद असल्याने शुल्कवाढ करण्यात येणार असल्याचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी सांगितले.