नाशिक : शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा

नाशिक : शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर सोमवारपासून कारवाईचा बडगा
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी शहरातील अधिकृत-अनधिकृत फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सोमवार (दि. 9)पासून धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. शहरात जवळपास 15 हजार इतके फेरीवाले अनधिकृत असल्याचा अंदाज मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी मनपा आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी शहर सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण याकडे विशेष लक्ष देण्यास प्राधान्य दिले आहे. त्याच दृष्टीने त्यांनी पाहणी दौर्‍याचा धडाका लावला आहे. याच पाहणी दौर्‍यांत अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहरातील रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीचा सर्वांत मोठा प्रश्न निर्माण झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे यात सुसूत्रता आणण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. फेरीवाल्यांसाठी फेरीवाला धोरणांतर्गत हॉकर्स झोन्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली असून, शहरातील सहाही विभागांत 10 हजार 614 फेरीवाले अधिकृत असल्याचे आढळून आले आहे. या फेरीवाल्यांचे फेरीवाला क्षेत्रात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. परंतु, अनेक ठिकाणी नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनीच जागेवर ताबा घेतल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवरच अनेकांनी व्यवसाय थाटला आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात येत्या सोमवारपासून मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पत्र उपआयुक्त (अतिक्रमण) करुणा डहाळे यांनी विभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत.

विभाग                      फेरीवाले         हॉकर्स झोन्स
नाशिक पूर्व                 1,195               18
नाशिक पश्चिम          2,072                46
पंचवटी                      2,099                50
नाशिकरोड                  2,007               52
नवीन नाशिक              1,702               31
सातपूर                        1,539              28
एकूण                           10,614           225

फेरसर्वेक्षण करणार
शहरातील सर्वच फेरीवाल्यांचे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार असून, विभागीय अधिकार्‍यांना तसे सूचित करण्यात आले आहे. या फेरसर्वेक्षणांतर्गत मंजूर फेरीवाला क्षेत्रात नोंदणीकृत फेरीवाले तसेच नोंदणी न झालेले फेरीवाले किती, ना फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करणारे नोंदणीकृत व अनोंदणीकृत फेरीवाले किती, नोंदणी प्रमाणपत्र वाटप झालेल्या फेरीवाल्यांची संख्या किती, याबाबतची माहिती सादर करण्यास विभागीय अधिकार्‍यांना सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news