नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
जेलरोड येथील जुना सायखेडा रोडवरील भंगार, रद्दीच्या दुकानाला व गोदामाला पहाटे 5 ला आग लागली. वेळीच अग्निशामक दल पोहोचल्याने शेजारील दुकानांना याची झळ पोहोचली नाही.
ब्रीजनगरजवळ आयूब रशीद खान (रा. वडाळा गाव, साहेबानगर) यांच्या मालकीचे रद्दी, प्लास्टिक, काचेच्या बाटल्यांचे दुकानवजा गोदाम आहे. आजूबाजूलादेखील अनेक दुकाने आहेत. मंगळवारी पहाटे या रोडवरून फिरण्यासाठी जाणार्या नागरिकांना या दुकानातून धूर येताना दिसला. निकम नामक व्यक्तीने त्वरित अग्निशमन दलाला कळवले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीने दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. ही माहिती समजताच नाशिकरोड येथील दोन, के.के. वाघ व मुख्यालयातील प्रत्येकी एक अशा एकूण चार बंबांनी एक ते दीड तासात आग आटोक्यात आणली. यामध्ये जवळपास एक ते दीड लाखाचे नुकसान झाले असल्याचे समजते. वेळीच अग्निशमन दल पोहोचल्याने मोठी हानी टाळली. माहिती समजताच माजी नगरसेवक शरद मोरे, विशाल संगमनेरे, संतोष कांबळे, दर्शन सोनवणे, राहुल बेरड, राहुल बोराडे, कामगारनेते मनोहर बोराडे, सामाजिक कार्यकर्ते संजय बोराडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जॉगर्स क्लबच्या अनेक नागरिकांनी गर्दी केल्याने आग विझविण्यात मोठी अडचण निर्माण झाली होती. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
चार दिवसांत चार घटना…
मागील चार दिवसांत शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात वडनेर दुमाला येथील भंगारवजा फर्निचरच्या गोदामाला लागलेली आग, जुन्या नाशकात फकीरवाडीतील घराला लागलेली आग, नाशिकरोड रेल्वेस्थानकात शालिमार एक्स्प्रेसच्या बोगीची आग आणि आजची ही चौथी आगीची घटना घडली आहे.