

नंदुरबार : पुढारी ऑनलाइन डेस्क | नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर पीतांबर चिमणराव सरोदे (92) यांचे आज शुक्रवार (दि.14) रोजी सकाळी 11.30 वा. निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यातील साहित्य सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
डॉक्टर पीतांबर चिमणराव सरोदे यांचा जन्म 30 सप्टेंबर 1932 साली जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झाला. त्यांनी 1967 पासून नंदुरबार येथील लोकमान्य टिळक वाचनालय या संस्थेच्या विविध पदांवर कार्य केले. ते नंदुरबार जिल्हा ग्रंथालयाचे संस्थापक कार्यवाह होते. या ग्रंथालयाच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. पीतांबर सरोदे यांनी धुळे जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह म्हणून तब्बल 30 वर्षे काम केले आहे. त्यांनी नंदुरबार व धुळे यासह शहादा, खापर, प्रकाशा, खरवड आदी ठिकाणी वाचनालयांची स्थापना केलेली आहे. मनमिळावू साहित्यिक हरपल्याने साहित्य सृष्टी सुनीसुनी झाली आहे.