

नंदुरबार : पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती संदर्भात महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit, Minister of Tribal Development of Maharashtra) यांनी तातडीची दखल घेत व आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत आज गुरुवार (दि.29) रोजी दुपारी चार वाजता पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती संदर्भात तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे.
पेसा भरती संदर्भात आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी आंदोलनाची दखल घेतली असून पेसा संवर्ग भरती संदर्भात आज गुरुवार (दि.29) रोजी मंत्रालयात मा. मुख्यमंत्र्यांसमवेत तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग भरतीसाठी आंदोलक नाशिक येथे आदिवासी विकास भवनाबाहेर उपोषणाला बसले आहेत. आदिवासी पेसा भरती कृती समितीतर्फे तपोवनातून बुधवार (दि.28) रोजी उलगुलान मोर्चा देखील काढण्यात आला. विविध आदिवासी संघटनांनी आणि समुदायाने पेसा क्षेत्रातील सतरा संवर्ग भरती करावी, या मागणीसाठी पाच दिवसांपासून नाशिक येथे आंदोलन चालवले आहे. हे सर्व लक्षात घेत महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit, Minister of Tribal Development of Maharashtra) यांनी नाशिक येथे आंदोलन स्थळी जाऊन तातडीने आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून तातडीने पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती संदर्भात निर्णय करण्याचे गांभीर्य विशद केले. या पार्श्वभूमीवर आज गुरुवार (दि.29) रोजी दुपारी चार वाजता पेसा क्षेत्रातील संवर्ग भरती संदर्भात तातडीची बैठक बोलावली सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे होणाऱ्या या बैठकीत राज्य शासनाची भूमिका आणि निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.