

नंदुरबार: पुढारी ऑनलाइन न्यूज | नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील लोहारा या गावात शेतकऱ्याने गुरांसाठी व साहित्य ठेवण्यासाठी बांधलेल्या गोठ्याला सोमवार (दि.17) रोजी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.
शहादा तालुक्यातील लोहारा गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला अचानक आग लागल्याची घटना सोमवार (दि.17) रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आगीच्या घटनेत गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य संपूर्णपणे जळून खाक झाले. गोठ्यात बांधण्यात आलेल्या दोन म्हशी होरपळून गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यामळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोहारा या गावातील रामभाऊ ओंकार माळी या शेतकऱ्याने गुरांसाठी व साहित्य ठेवण्यासाठी बांधलेल्या गोठ्याला सोमवार (दि.17) रोजी सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी जात आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यास यश मिळाले नाही. सरपंच, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन ते तीन तासानंतर आग आटोक्यात आली आहे.
गोठ्याला लागलेल्या या आगीत पाईप तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. यात साधारण सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच आगीत दोन म्हशी जखमी झाल्या आहेत. तर गोठ्याच्या शेजारील विनोद सरदार पवार, कैलास सरदार पवार यांच्या घरालाही आग लागल्याने त्यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. पोलीस प्रशासन व महसूल विभाग घटना स्थळीचा पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबानी लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
आगीची माहिती अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. परंतु त्यानंतर वाहन पोहचण्यास उशीर झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शहादा ते लोहारा गावाचे अंतर फक्त पंधरा मिनीटांचे असून स्थानिक ग्रामस्थांनी अग्निशामक दलाच्या वाहनासाठी कॉल केला असता तब्बल दोन तासानंतर वाहन आले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या तत्परतेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अखेर ग्रामस्थांनीच एकजुटीने भीषण आग आटोक्यात आणली आहे.