Nandurbar Bribe | PWD च्या उपअभियंत्याला ८ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कामाच्या बिलावर सह्या करण्यासाठी मागितली लाच
Bribe Case
Bribe CasePudhari
Published on
Updated on

PWD Deputy Engineer Arrested

नंदुरबार : दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कामाच्या बिलावर सह्या करण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) उपविभागातील उपअभियंता रंगेहात पकडण्यात आला. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असून, या घटनेमुळे नंदुरबारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी नितीन दत्तात्रय इंगळे (वय ५३), उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत), नंदुरबार याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून नोंदणीकृत फर्ममार्फत ते शासनाची विद्युत कामे करतात. धुळे सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील २८ गाव-पाड्यांमध्ये एलईडी सोलर स्ट्रीटलाईट बसविण्याचे काम तक्रारदाराला मंजूर झाले होते. या कामाची एकूण किंमत (जीएसटी वगळता) २ कोटी ३७ लाख २९ हजार ३५६ रुपये इतकी होती. संबंधित कामे मुदतीत पूर्ण करण्यात आली होती.

Bribe Case
Kirit Somaiya Nandurbar | अचानक नंदुरबार दौरा करून किरीट सोमय्या यांनी बनावट दाखला प्रकरणात केली छाननी

या कामांपैकी मार्च २०२५ मध्ये तक्रारदाराला ४१ लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते. मात्र या बिलाच्या मोबदल्यात उपअभियंता इंगळे याने तक्रारदाराकडून ८० हजार रुपये स्वीकारले असून उर्वरित ३० हजार रुपये पुढील बिलाच्या वेळी देण्यास सांगितले होते. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये उर्वरित कामाचे २ कोटी २ लाख ५ हजार ५२५ रुपये तक्रारदाराच्या फर्मच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.

या रकमेचे बिल अदा केल्याच्या मोबदल्यात उपअभियंता इंगळे याने तक्रारदाराकडे ८ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर सह्या करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. या मागणीमुळे तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

Bribe Case
Nandurbar Crime | बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश; नंदुरबारमध्ये वकिलासह पाच जण अटकेत

तक्रारीच्या आधारे धुळे एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तडजोडीनंतर आठ लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केल्यानंतर, तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताना उपअभियंता नितीन इंगळे याला रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपअधिक्षक सचिन साळुंखे करीत आहेत. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक भरत तांगडे, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news