Nandurbar : दुर्गम भागातील प्रत्येक घरात वीज पोहोचावी म्हणून 400 कोटी निधीचे नियोजन : डॉ. विजयकुमार गावित

Nandurbar : दुर्गम भागातील प्रत्येक घरात वीज पोहोचावी म्हणून 400 कोटी निधीचे नियोजन : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार – विजेअभावी 83 गावे 765 पाडे अंधारात असल्याचे खासदार डॉक्टर हिना गावित यांनी संसदेत भाषणातून सांगितले होते. पंतप्रधान मोदींनी त्याची दखल घेत हर घर बिजली योजना आणली. त्याची अंमलबजावणी करण्यावर आपण विशेष भर दिला. विद्युत पुरवठा नसलेल्या घरकुलांविषयीसुध्दा सतत पाठपुरावा चालू ठेवला असून अक्कलकुवा धडगाव या दोन्ही तालुक्यात आतापर्यंत 55000 घरकुलांना वीज दिली. दुर्गम भागातील प्रत्येक घरात वीज पोहोचावी म्हणून 400 कोटी रुपये निधी उपलब्ध करण्याचे नियोजनही केले असून दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या समृद्धीसाठी वैयक्तिक व सामुहिक योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

अक्कलकुवा तालुक्यातील 30 गावांमध्ये आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या रस्ते, कॉंक्रिटीकरण, पूल आणि तत्सम 30 विविध विकास कामांचे भुमिपूजन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी 2024 या दोन दिवसात पार पडले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जि.प. सदस्य आरिफ मक्रानी, प्रताप वसावे, यशवंत नाईक, पं.सं.सदस्य सुधीर पाडवी,अशोक राऊत, भाजप तालुका प्रमुख नितेश वळवी, विनोद कामे, दिशा समिती सदस्य बबिता नाईक, विश्वास मराठे, जयमल पाडवी, अमरसिंग वळवी, जगदिश पाडवी, नटवर पाडवी,मनोज डागा,मथुराबाई पाडवी, सुरेश जैन,एस.बी.जैन, रमेश नाईक, महावीर पाडवी, शमशोद्दीम मक्रानी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ गावित म्हणाले, जिल्ह्यात कोणी बेघर राहू नये हा प्रयत्न आहे. यावर्षी 24000 घरकुल वाटप करायला घेतले. यापुढे स्थलांतर होऊ नये म्हणून स्थानिक रोजगार निर्मितीवर भर दिला. अक्कलकुवा धडगाव तालुक्यात पंतप्रधान सडक योजनेतून पंधरा रस्ते खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मंजूर करून आणले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विविध योजना खासदार डॉ. हिना गावित यांच्या माध्यमातून धुळे-नंदुरबार जिल्ह्यात राबवल्या जात आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक नागरिकाला पाहिजे त्या सरकारी योजनांचा लाभ करून देण्याचे नियोजन असून येत्या काही दिवसात त्याचे दृष्य परिणामही जिल्हावासीयांना दिसायला मिळणार आहेत.

जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिकांना त्यांचे जीवन आत्मनिर्भर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या मार्फत विविध विकासाच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून येथील नागरिकांना आपल्या गावातच स्थानिक पातळींवर रोजगार उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. तसेच महिलांनाही आपले कामकाज सांभाळून कौशल्यावर आधारित रोजगार उपलब्ध करून बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचाही आदिवासी विकास विभागाचा मंत्री या नात्याने प्रयत्न आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news