

नंदुरबार - येथे गाजत असलेल्या जमीन घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी मांडली. यामुळे नंदुरबार येथील भूमाफियांना मोठा दणका बसला असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात नंदुरबार येथील तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले आहे.
डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात सांगितले की, या जमीन घोटाळे प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यास एक महिना उशीर केला म्हणून नंदुरबार येथील संबंधित तहसीलदार यांना निलंबित करण्यात येत असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून केली जाईल. मंडळ अधिकारी पठाण यांच्याकडील अवैध नोंदी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचे वादग्रस्त महसूली आदेश या संदर्भाने जे जे दोषी आढळले त्या सर्वांना अटक करा असा आदेश मी आजच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले. महसुली विभाग अंतर्गत देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत शंभर नोटीसा काढल्या जातील असेही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, सभागृहात लक्षवेधी प्रश्न मांडताना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, टोकर तलाव येथील कामगार इनामजमीन बेकायदा ताब्यात घेऊन नजराणा न भरता नावावर हस्तांतरित करणे, ढेकवद शिवारातील गट नंबर 44 वरील जमीनी संबंधित कुळ कायदा कागदपत्रे बदलवून हस्तांतरित करणे, नंदुरबार शिवारातील सरकारी पडीक जमीन तसेच गट नंबर 405 वरील गुरुचरण जमीन, देवस्थान इनाम जमीन परस्पर हस्तांतरित करणे असे अनेक गैरप्रकार केले गेले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशांचा गैरवापर करून जमिनी हडप केल्याची 20 प्रकरणे समोर आली होती. परंतू चौकशी समितीमार्फत एफ आय आर दाखल करताना संबंधित बडे बिल्डर आणि नेते यांची नावे वगळण्यात आली होती त्या सर्वांवर कारवाई होणे गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे.
तक्रारींच्या आधारे नंदुरबारच्या उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी स्वतः नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर महसुलच्या जुन्या इमारतीत अचानक रेड टाकून या कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. त्यानंतरही महिनाभर संबंधित तहसीलदारांनी कारवाई केली नव्हती. नंतर दिनांक 25 जून 2025 रोजी नायब तहसिलदार नितीन रमेश पाटील वय यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त मंडळ अधिकारी झाकीर एम. पठाण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पठाण यांनी शासकीय अधिकारी असल्याचे भासवून विविध सरकारी नोंदी ताब्यात ठेवल्या. तलाठी नंदुरबार कार्यालयाशी संबधीत कागदपत्रे, मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाशी संबधीत कागदपत्रे, बालाजी मंजुळे, माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले/नसलेले विवादस्पद आदेश, इतर विवादस्पद आदेशाच्या प्रती (सहया असलेली / नसलेली), महागडया व मोठ्या वस्तु यांची माहिती व इतर वस्तु आढळून आल्याचे म्हटले आहे. गावित यांनी जमीन घोटाळे प्रकरण मांडल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची मागणी मान्य करून सगळ्या दोशींवर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहेत. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सर्व दोषींना अटक करण्याची सूचना केली असल्याची माहिती दिली.