

Nandurbar Road Blocked Landslide
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नद्या, नाले आणि धरणांतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. सततच्या पावसामुळे धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर नवापूर तालुक्यातील नागझरी-खोकसा पुलावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहने वळविण्यात आली आहेत. दरम्यान, प्रकाशा, सारंगखेडा आणि रंगावली प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यंदाचा जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर जुलै महिन्यातही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नव्हता. मात्र ३० जुलैपासून पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जुलैअखेर धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहादा तालुक्यातील प्रकाशा पाटबंधारे उपविभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ३१) सकाळी साडेदहा वाजेपासून तापी नदीवरील प्रकाशा बॅरेजचे ४१ पैकी चार दरवाजे पूर्ण, तर ३२ दरवाजे दोन मीटर उंचीने उघडण्यात आले. त्यातून सुमारे १ लाख ८५ हजार ८२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पुढील काही तासांत हा विसर्ग ३.५० ते ४.५० लाख क्युसेक्सपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दुपारी १२ वाजल्यापासून सारंगखेडा बॅरेजचे चार दरवाजे पूर्ण व तीन दरवाजे दोन मीटर उंचीने उघडून ९९ हजार १८७ क्युसेक्स, तर प्रकाशा प्रकल्पातून ९४ हजार ५१३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच धुळे जिल्ह्यातील सुलवाडे मध्यम प्रकल्पातूनही पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने तापी नदीतील पाण्याची पातळी आणखी वाढू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
यामुळे तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, गुरेढोरे नदीकाठी सोडू नयेत तसेच नदीपात्रातील पाण्याचे पंप व इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
नवापूर तालुक्यातील रंगावली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाची पाणीपातळी २२६.२५ मीटरवर पोहोचली आहे. प्रकल्पातून सध्या ५ हजार ४९४.५६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर उन्बर्डी, खर्बर्डी, प्रतापपूर, चौकी, बोकळझर, रायपूर, धनराट, नांदवन, विजापूर, मोरथवा, वागळापाडा आणि नवापूर या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.