

Crop Damage Drought Nandurbar
नंदुरबार : जूननंतर जुलै महिनाही बहुतांश कोरडा गेल्याने नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी ( दि. २१) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सलग झालेल्या झिमझिम पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जागृत केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन, प्रचंड उकाडा आणि मध्येच दाटून येणारे ढग असा वातावरणाचा लपंडाव सुरू होता. मात्र, पाऊस सातत्याने हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले होते. आज झालेल्या रिमझिम पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी हा पाऊस पुढेही कायम राहणार का, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरी तर काही भागांत हलका पाऊस झाला.
नंदुरबार जिल्ह्यात वार्षिक सरासरी ८०० मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ३१३ मिलिमीटर पाऊस केवळ जुलै महिन्यात अपेक्षित असतो. मात्र, यंदा जुलै महिन्यात आतापर्यंत अवघा ८५ मिलिमीटर पाऊस झाला असून महिन्याच्या पहिल्या २० दिवसांत केवळ सहा दिवसच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला असून अनेक शेतकऱ्यांची पेरणी रखडली आहे. खरेदी केलेले बियाणे आणि खते वापराविना पडून आहेत.
पावसाअभावी जिल्ह्यात खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. आतापर्यंत केवळ १ लाख १४ हजार ३२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. यामध्ये ५३ हजार ४७२ हेक्टरवर कापूस, २२ हजार ६८५ हेक्टरवर मका, १० हजार ८५० हेक्टरवर ज्वारी, ६०० हेक्टरवर बाजरी, ६ हजार ७२२ हेक्टरवर भात, ११ हजार ३८१ हेक्टरवर सोयाबीन तर १ हजार ७७५ हेक्टरवर कडधान्यांची लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील धान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पावसाअभावी बियाण्यांची खरेदी मंदावली असून रासायनिक खतांचाही मोठा साठा पडून आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने १ लाख ४० हजार ९५० मेट्रिक टन खतांची मागणी केली होती. त्यापैकी ८४ हजार ५७६ टन खतांचा पुरवठा झाला असून ६२ हजार ६९८ टन खतांची उचल झाली आहे. सध्या सुमारे ३२ हजार १८८ टन खतांचा, त्यात १८ हजार टन युरियाचा साठा शिल्लक आहे.
सध्या झालेल्या झिमझिम पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी खरीप हंगाम वाचविण्यासाठी जिल्ह्याला आता दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची नितांत गरज असल्याचे चित्र आहे.