

नंदुरबार - भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप करणाऱ्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याप्रकरणी अखेरीस भाजपाचे माजी महामंत्री तथा प्रदेश सहसंयोजक विजय चौधरी यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. आपणास सर्व पदावरून मुक्त करण्यात येत आहे, असे सांगणारे चार ओळीचे पत्र पक्षाकडून विजय चौधरी यांना देण्यात आले आहे.
भाजपाचे काही मंत्री, काही आमदार, अनेक वरिष्ठ पदाधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि सामान्य कार्यकर्ते यांच्याशी विजय चौधरी यांनी फोनवरून वेळोवेळी केलेला संवाद त्या कथित ऑडिओ क्लिप्स मधून उघड झाला तेव्हापासून खानदेशातील राजकारणात भूकंप झाला आहे. विजय चौधरी यांच्या आवाजातील त्या संवादातून आपल्याच पक्षातील अनेक महिला कार्यकर्त्या, पक्षातील पदाधिकारी, पक्षाचे लोकप्रतिनिधी यांच्या विषयी अत्यंत अपमानजनक भाषेत बोलल्या गेल्याचे समोर आले. त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित, शिवसेनेच्या मालती वळवी यांच्या विषयी देखील अपमान जनक उल्लेख समोर आले.
त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चे काढून विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तर विजय चौधरी यांनी त्या ऑडिओ क्लिप्स बनावट असल्याचा दावा केला होता. त्यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून विजय चौधरी यांचा मोबाईल चोरल्याप्रकरणी त्यांचा पी ए यश टिपारे याला अटक करण्यात आली होती तथापि नंतर जामिनावर सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान, विजय चौधरी यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार तीन गुन्हे दाखल झाले असून विजय चौधरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाची निःपक्ष चौकशी व्हावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे सांगून त्यांनी पदाचा त्याग केला होता. परंतु फक्त राजीनामा स्वीकारू नये तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी; अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपाकडे वारंवार करण्यात आली. परिणामी आता पक्षाने त्यांची सर्व पदांवरून मुक्तता करण्यात येत असल्याचे पत्र देत पक्षातून बाजूला सारले आहे. यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय चौधरी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
'त्या' पत्रात काय म्हटले आहे?
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक यांनी विजय चौधरी यांना सर्व पदांवरून मुक्त करण्यात येत असल्याचे पत्र दिले आहे. एडवोकेट माधवी नाईक यांनी विजय चौधरींना उद्देशून दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण माननीय प्रदेश अध्यक्षांकडे दि. २५ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रास अनुसरून आपल्या विनंतीनुसार भारतीय जनता पक्षाच्या सर्व जबाबदारीतून आपणास पदमुक्त करण्यात येत आहे. कृपया नोंद घ्यावी.