

नंदुरबार: भाजप नेते विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्हा पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलेला त्यांचा माजी स्वीय सहाय्यक यश टिपरे याला आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने अॅड. बंडू जोशी यांनी न्यायालयात बाजू मांडली.
भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते अडचणीत आले असून विजय चौधरी यांना उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तरीही हे वादळ अजून थांबलेले नाही.
विजय चौधरी यांनी माजी खासदार डॉ. हिना गावित आणि शिवसेनेच्या मालती वळवी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे या कथित ऑडिओ क्लिपमधून समोर आल्याचा दावा करण्यात आला असून, त्या आधारे विजय चौधरी यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे त्यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.
दरम्यान, या ऑडिओ क्लिपप्रकरणी विजय चौधरी यांच्या मुलाने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांच्या तपासादरम्यान, चौधरी यांचा माजी स्वीय सहाय्यक यश टिपरे याने त्यांच्या मोबाईलमधून पेनड्राईव्हद्वारे डेटा काढून ती क्लिप व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर नंदुरबार पोलिसांनी धडक कारवाई करत यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेतले होते.
आज, ५ ऑगस्ट २०२६ रोजी या प्रकरणातील संशयित आरोपी यश टिपरे याला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान आरोपीच्या बाजूने अॅडव्होकेट बंडू जोशी यांनी जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने अॅड. बंडू जोशी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत यश टिपरे याला जामीन मंजूर केला, अशी माहिती अॅडव्होकेट बंडू जोशी यांनी दिली आहे.