

BJP ST Morcha Dr Supriya Gavit
नंदुरबार : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (ST) मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव एम. होळी आणि मोर्चाचे प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा आमदार योगेश सागर यांनी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी डॉ. सुप्रियाताई गावित यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्राच्या विविध भागांतील मराठवाडा, विदर्भ, ठाणे आणि उत्तर महाराष्ट्रातून प्रदेश कार्यकारिणीवर आठ उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून डॉ. सुप्रियाताई गावित यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
नंदुरबार शहरातील खोडाई माता रोड येथील त्यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन डॉ. सुप्रियाताई गावित यांचा सत्कार केला. यावेळी माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांचेही अभिनंदन करण्यात आले. नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, शहादा आणि तळोदा तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुप्रियाताई गावित या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनी गावित यांच्या कन्या आहेत. तसेच त्या माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांच्या भगिनी आहेत.
डॉ. सुप्रियाताई गावित यांनी डॉ. विजयकुमार गावित आणि डॉ. हिनाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर कार्यरत असताना विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.