Lok sabha Election 2024 Results : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी; मतदारांनी दिला काँग्रेसला कौल

Lok sabha Election 2024 Results : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी; मतदारांनी दिला काँग्रेसला कौल
Published on
Updated on

नंदुरबार – काँग्रेसचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांनी अनपेक्षितपणे मतमोजणीतील पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवत 1 लाख 59 हजार 32 इतक्या मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस पक्षाचे पुन्हा वर्चस्व स्थापित झाले. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांचा पराभव झाला असून गोवाल पाडवी यांच्या विजयामुळे त्यांची हॅट्रिक हुकली. डॉक्टर हिना गावित यांना 5 लाख 85 हजार 847 मते प्राप्त झाली आहेत. डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केलेली असताना सुद्धा मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.

पहिल्या फेरीतच आघाडी

गोवाल पाडवी यांनी पहिल्या फेरीतच आघाडी घेतली होती. डॉक्टर हिना गावित यांच्यापेक्षा 32 हजार मतांनी ते पुढे होते. एकेक फेरी होत गेली तसे पाडवी यांचे मताधिक्य वाढत गेले. पंधराव्या फेरीनंतरही दीड लाखाहून अधिक चा लीड कायम राहिला. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानून काँग्रेस समर्थकांनी तसेच महाविकास आघाडी समर्थकांनी सर्वत्र फटाके फोडून आनंद व्यक्त करणे सुरू केले. निकाल घोषित होताच भारतीय जनता पार्टीसह महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. गुलाल उधळून आणि आतशबाजी करून ढोल ताशांच्या गजरात प्रचंड आनंद साजरा केला. विजय झालेले उमेदवार गोवाल पाडवी हे काँग्रेसचे माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी यांचे चिरंजीव आहेत. नंदुरबार येथील त्यांच्या निवासस्थानी तसेच त्यांचे मूळ गाव असलेल्या धडगाव तालुक्यात देखील प्रचंड जल्लोष करण्यात आला.

लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्याचे प्रमाणपत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत गोवाला पाडवी यांनी स्वीकारले त्याप्रसंगी त्यांचे पिताश्री माजी मंत्री के सी पाडवी,त्यांच्या मातोश्री हेमलता पाडवी, नवापूर चे काँग्रेस आमदार शिरीष कुमार नाईक, शिवसेनेच्या अरुण आप्पा चौधरी, जयपाल सिंह रावल, प्रतिभा शिंदे व अन्य उपस्थित होते.

1 लाख 59 हजाराचा फरक

दरम्यान मतमोजणीच्या एकंदरीत 27 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर गोवाल पाडवी यांना 7 लाख 44 हजार 879 मते मिळाली तर भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांना 5 लाख 85 हजार 847 मते मिळाली. 1 लाख 59 हजार 32 इतक्या मतांच्या फरकाने गोवाल पाडवी निवडून आले आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार संख्या 19 लाख 70 हजार 327 आहे. त्यापैकी 13 लाख 92 हजार 710 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. प्रत्यक्षात मात्र महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित आणि महाविकास आघाडीचे एडवोकेट गोवाल पाडवी यांच्यात म्हणजेच भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढाई रंगली होती.

के सी पाडवींनी सांभाळली सूत्र

काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या बाजूने त्यांचे पिताश्री माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी हेच एकमेव सर्व सूत्र सांभाळत होते. नवापूर तालुक्यातील आमदार शिरीष नाईक आणि अन्य बोटावर मोजण्याइतके नेते वगळता भाजपा इतकी प्रभावी नेते मंडळी प्रचारासाठी नव्हती. शिवाय आर्थिक बळ मनुष्यबळ दिसले नाही. ही काँग्रेस उमेदवाराची कमतरता मानली जात होती.त्याचवेळी भाजपाच्या प्रस्थापित उमेदवारा विरोधात महाविकास आघाडीने राजकीय आणि सामाजिक कार्याचा रकाना कोरा रिकामा असलेले गोवाल पाडवी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून उतरवणे धाडसाचे म्हटले गेले होते. गावित परिवाराने केलेल्या विकास कामांवर मतपेटीतून शिक्कामोर्तब होणार का? भाजपाच्या डॉक्टर हिना गावित यांची हॅट्रिक होणार का? काँग्रेसने उभा केलेला नवखा चेहरा स्वीकारून मतदार परिवर्तन घडवणार का? अशा असंख्य प्रश्नांची उत्सुकता ताणलेली होती. आज मतमोजणीनंतर मात्र याविषयीचे निराळे चित्र स्पष्ट झाले. डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केलेली असताना सुद्धा मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news