Chandrakant Valvi Land | राज्यात गाजणारी ‘ती’ जमीन जावळीचे मोरे यांच्या वंशजांची?

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा- माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले आणि त्यामुळे सध्या अहमदाबाद (गुजरात) येथे जीएसटी उपमुख्य आयुक्तपदी कार्यरत असलेले चंद्रकांत वळवी यांचे कांदाटी खोऱ्यातील तब्बल 640 एकर जमीन खरेदीचे वादग्रस्त प्रकरण राज्यभरात चर्चेत आले. राज्यभरात चर्चेत आलेले हे चंद्रकांत वळवी मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील रहिवासी असल्याने सध्या नंदुरबार मध्ये देखील या प्रकरणाची खमंग चर्चा चालू आहे.

माहिती कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, जीएसटी उपमुख्य आयुक्त चंद्रकांत वळवी, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक अशा एकूण 13 जणांनी सातारा जिल्ह्यातल्या सर्वात अतिदुर्गम व पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यात झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गाव खरेदी केले आहे. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986, वन (संरक्षण) अधिनियम, 1976 व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 सारख्या अनेक महत्त्वपूर्ण कायद्यांचे राजरोसपणे नियमित उल्लंघन होत आहे; हा मोरे यांनी आरोप केला आहे. सुशांत मोरे असंही सांगतात की, झाडाणी येथील संबंधित भूखंडमाफिया हा गुजरात येथील एका मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. त्या नेत्याच्या आशीर्वादानेच येथे एवढे मोठे अनधिकृत रिसॉर्ट बांधकाम होत आहे. दरम्यान रेणुसे ते झाडाणीवरून उचाट ते रघुवीर घाट हा दोन पदरी रस्ता देखील होत आहे. या रस्त्याची आवश्यकता नसतानाही हा रस्ता केला जात आहे. यासाठी रेणुसे गावात डांबर प्लांट सुद्धा अनधिकृतपणे सुरू आहे. मात्र, या कांदाटी- नंदुरबार- गुजरात कनेक्शनचे नेमके गौडबंगाल काय? हे अद्याप गुलदस्त्यात असल्याचे मोरे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांना चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी झाडाणीप्रकरणी अहवाल सादर केला असून त्यामध्ये नेमकं काय आहे, हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

हे आहे या प्रकरणाचे नंदुरबार कनेक्शन

नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम सनदी अधिकारी होण्याचा मान पटकावलेले चंद्रकांत रावजी वळवी यांची काही दिवसांपूर्वीच मुख्य आयुक्त (जीएसटी प्रिंसिपल कमिशनर) पदी बढती झाली. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे विक्री व सेवाकर उपमुख्य आयुक्त म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत वळवी हे नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा तालुका नवापूर येथील रहिवासी असून. सर्वप्रथम आयकर निरीक्षक म्हणून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी सन 1991 मध्ये यश संपादन केले होते. त्यानंतर सनदी अधिकारी होण्याच्या ध्येयाने त्यांनी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्यात यश संपादन केले. भारतीय महसूल सेवा संवर्गात विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे कारभार सांभाळला. ते सध्या गुजरात राज्याचे उपमुख्य वस्तू व सेवा कर आयुक्त (जीएसटी) या पदावर कार्यरत आहेत. कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि काम करण्याची सचोटी यासाठी ओळखले जाणारे चंद्रकांत वळवी अचानक जमीन खरेदी प्रकरणात कसे अडकले? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.  यासाठी वळवी यांच्या नंदुरबार येथील नातलगांशी संपर्क केला असता, चंद्रकांत वळवी यांचा खांडबारा भागात पूर्वीप्रमाणे संपर्क नसल्याचे सांगण्यात आले.

'ती' वादग्रस्त जमीन शिवकालीन मोरे घराण्याची?

चंद्रकांत वळवी यांच्या परिवारातील काही सदस्यांचे म्हणणे आहे की, चंद्रकांत वळवी यांनी ही शेकडो एकर जमीनीची खरेदी आताच एका दमात केली, असे घडलेले नाही. पंधरा-सोळा वर्षांपूर्वी त्यांनी झाडणी गावात जमीन घ्यायला सुरुवात केली होती. टप्प्याटप्प्याने थोडी थोडी करून स्वतः वळवी आणि त्यांच्या नात्यातील लोकांनी काही वर्षात ती खरेदी केली. मग आताच वाद उफाळण्याचे कारण काय? याचा संदर्भ देताना वळवी परिवारातील सदस्यांनी दावा केला की, छत्रपती शिवरायांच्या काळात जावळीच्या मोरे सरदारांचे घराणे गाजले होते. त्या मोरे घराण्याच्या मालकीची हजारो एकर जमीन सातारा जिल्ह्यात आहे. मोरे यांच्या वंशजांच्या मालकीची महाबळेश्वर लगत दरी डोंगराच्या भागातील अशी बरीचशी पडीत जमीन वापराविना पडली होती. त्यातीलच शेकडो एकर जमीन वळवी यांनी खरेदी केली असून कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, तथापि त्या भागात दुतर्फी रस्ता निर्मिती करणारा ठेकेदार आणि स्थानिक रहिवासी यांच्यात वाद झाला आणि त्या वादाला हे निराळे वळण मिळाले, असा दावा वळवी परिवारातील सदस्यांकडून केला जात आहे. असे असले तरी पुण्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर झालेला अहवाल नेमकं काय सांगतो यावर पुढील सर्व कारवाई अवलंबून राहील असे दिसते आणि त्यामुळेच त्या अहवालात लपले काय? याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news