

नंदुरबार : पुढारी ऑनलाइन डेस्क | नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी शिवजयंती उत्सव, दहावी-बारावीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने आगामी 14 दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
शिवजयंती उत्सव - 19 फेब्रुवारी रोजी शासकीय शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. विविध संघटनांच्या कार्यक्रमांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
दहावी-बारावीच्या परीक्षा - 11 फेब्रुवारी ते 17 मार्च, 2025 या कालावधीत परीक्षा (Maharashtra 10th & 12th Board Exam 2025) आहेत. परीक्षा केंद्रांवर नातेवाईकांची गर्दी आणि कॉपीच्या प्रयत्नांमुळे गोंधळ होऊ शकतो.
संवेदनशील वातावरण - जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी जातीय दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
शस्त्रबंदी- सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे बाळगण्यास मनाई आहे.
जमावबंदी - पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई. मिरवणुका, सभा आणि घोषणाबाजीवरही बंदी करण्यात आली आहे.
प्रतिबंध - सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असे भाषण करणे, हावभाव करणे किंवा कोणतेही प्रदर्शन करण्यास मनाई.
वृद्ध आणि अपंग व्यक्तींना लाठी घेऊन फिरण्याची परवानगी.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगण्याची परवानगी.
लग्न मिरवणूक, आठवडे बाजार, अंत्ययात्रा आणि शासकीय कामांसाठी जमावबंदीतून सवलत.
हे आदेश 6 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून 20 फेब्रुवारी 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात अंमलात राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थानिक पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल. संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परवानगी दिल्यास त्याची माहिती तात्काळ कार्यकारी दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी कार्यालयास सादर करावी. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे